
बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा गुरूवारी सायंकाळी थंडावल्या. मतदानाचा उद्या तिसरा व अंतिम टप्पा असून या टप्प्यात 1204 उमेदवारांचे भाग्य मशीनबंद होणार असून त्यात 12 मोठय़ा चेहऱयांचा समावेश आहे. या टप्प्यात राष्ट्रीय जनता दलाचे सर्वाधिक उमेदवार रिंगणात असून त्यानंतर लोक जनशक्ती पक्षाचा क्रमांक लागतो.
बिहारची निवडणुक भाजपासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. त्यासाठीच निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक सभा बिहारमध्ये झाल्या. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्यासाठी प्रचारात खूप मेहनत घेतली. भाजपा, जनता दल युनायटेड, काँग्रेस राष्ट्रीय जनता दल, लोक जनशक्ती पार्टी अशा सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार केला.
उद्या अंतिम टप्प्यात बिहारच्या 15 जिह्यांतील 78 जागांसाठी मतदान होणार आहे. त्या जागांसाठी 1094 पुरूष तर 110 महिला उमेदवार रिंगणात असून त्यांच्या भाग्याचा फैसला 2 कोटी 35 लाख 54 हजार 71 मतदार आपले अमूल्य मत देऊन करणार आहेत.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर होणाऱया बिहार निवडणुकीसाठी निवडणुक आयोगाने 7 लाख हॅन्ड सॅनिटायझर्स, 46 लाख मास्क, 6 लाख पीपीई कीट्स. 6.7 लाख फेस शील्ड्स आणि 23 लाख जोडी हॅन्डग्लोव्हजची व्यवस्था केली आहे. तसेच मागणीप्रमाणे पोस्टल मतदानाचीही व्यवस्था केली आहे.


























































