
पंतप्रधान नरेंद्र मोदी, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या नावाची हॉलतिकीट छापण्यात आली आहेत. हा अजब प्रकार बिहार येथील एका विद्यापीठात उघड झाला आहे. त्यावरून बिहारच्या विद्यापीठाची खिल्ली उडवली जात आहे.
हा प्रकार ललित नारायण मिथिला विद्यापीठात घडला आहे. या विद्यापीठाशी संलग्न असलेल्या गणेशदत्त महाविद्यालयातील परीक्षा अधिकाऱ्यांचा हा प्रताप आहे. महाविद्यालयात होणाऱ्या परीक्षांसाठी या अधिकाऱ्यांना हॉलतिकीट बनवण्याचं काम देण्यात आलं होतं. पण, परीक्षा अधिकाऱ्यांच्या अक्षम्य निकाष्ळजी वृत्तीमुळे भलत्याच नावाने हॉलतिकीट छापली गेली. त्यात अनेक गंभीर चुका होत्या.
त्यातील अनेक हॉल तिकीटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन अशांसह अनेक सेलिब्रिटी आणि मान्यवरांचे फोटो आणि नावं छापून आली होती. त्यामुळे या मान्यवरांच्या नावांखाली ज्यांचे क्रमांक आले आहेत, ते विद्यार्थी बुचकळ्यात पडले आहेत. त्यांना परीक्षा बुडण्याची धास्ती वाटत आहे. गंभीर म्हणजे, याची तक्रार करूनही महाविद्यालय प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेतल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
कला शाखेच्या परीक्षांसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना अशा प्रकारचा अनागोंदी कारभार उघड झाल्याने विद्यार्थी वैतागले आहेत. काही वैतागलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाविरुद्ध आंदोलन केलं आहे.


























































