
सामना ऑनलाईन । पाटणा
पावसाळा म्हटला की विजांचा कडकडाटही आलाच. सगळेच विजेच्या कडकडाटाला घाबरतात. पण, बिहारमध्ये याच विजेमुळे एका नवरदेवावर लग्न मोडण्याची पाळी आली आहे. होणारा नवरा विजेला घाबरतो म्हणून एका तरुणीने लग्न मोडल्याची अजब आणि तितकीच हास्यास्पद घटना घडली आहे.
पाटण्यातल्या चित्रसेनपुर येथील रहिवासी असलेल्या रेणु कुमारी हिचा विवाह ठरला होता. लग्नापूर्वीचे विधीही संपन्न झाले होते. लग्नाच्या दिवशी विजांचा कडकडाट झाला आणि नवरदेवाची घाबरगुंडी उडाली. भीतीपोटी तो विचित्र वागू लागला. नवरा विजेला घाबरतो हे पाहून रेणूने लग्न मोडलं. वधुपक्षानेही हा प्रकार बघून वरपक्षाची धुलाई करायला सुरुवात केली.
क्षुल्लक कारणाने लग्न मोडल्याच्या रागावरून वरपक्षाचीही मग वधुपक्षासोबत फ्रीस्टाईल जुंपली. हे प्रकरण गंभीर होईल या भीतीने पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलिसांनी येऊन दोन्ही पक्षांमधलं भांडण सोडवलं आणि वधुपक्षाकडील तीन नातेवाईंकाना अटकही केली. विजेला घाबरणाऱ्या तरुणासोबत लग्नाला नकार दिल्याची ही घटना पहिलीच आहे. यापूर्वी बुटकेपणा, सावळा रंग आणि टक्कल या कारणांसाठी वधूंनी लग्न मोडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

























































