
बिहारमधील मधेपुरा जिल्ह्यात मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर 70 हून अधिक विद्यार्थी आजारी पडल्याची घटना घडली आहे. साहुगढ येथील उत्क्रमित मध्य विद्यालय कारू टोला येथे हा प्रकार घडला. सर्व विद्यार्थ्यांना तातडीने सदर रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधारल्यानंतर संध्याकाळी त्यांना घरी सोडण्यात आले. अन्नात पाल पडल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
शाळा व्यवस्थापनानुसार, शनिवारी दुपारी सुमारे 1.30 वाजता विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात आले. जेवणानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांची तब्येत बिघडू लागली. काही क्षणांतच 70 हून अधिक विद्यार्थी आजारी पडले. उलट्या, पोटदुखीची तक्रार करू लागल्याने शाळेत एकच गोंधळ उडाला. माहिती मिळताच चार रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या आणि सर्व विद्यार्थ्यांना सदर रुग्णालयात नेण्यात आले.
इयत्ता आठवीतील सुधा कुमारी या विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असून तिला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका नूतन कुमारी यांनी सांगितले की, पारस अॅग्रो एजन्सीकडून मध्यान्ह भोजन पुरवण्यात आले होते. अनेक विद्यार्थ्यांना अन्न दिल्यानंतर त्यात पाल पडल्याचे लक्षात आले.
दरम्यान, या घटनेनंतर पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. काही पालकांनी शाळेतील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रुपेश कुमार आणि जगदीश यादव यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यापूर्वी अन्नाची तपासणी झाली पाहिजे होती. निष्काळजीपणामुळेच मुले आजारी पडली, असा आरोप त्यांनी केला.
























































