
बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी राजीनामा देऊन महिना उलटला आहे. मुख्यमंत्री पदाचे हे घोंगडे भिजतच असून, मुख्यमंत्री कोण होणार? याकडे लक्ष लागले आहे. 5 मार्चपासून अद्याप रिक्त असलेल्या या जागेवर भाजपने दावा केला असला तरी जेडीयू आमदार आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. जेडीयूचे आमदार श्याम रजक म्हणाले की, निशांतमध्ये मुख्यमंत्री बनण्याचे सर्व गुण आहेत. ते सुशिक्षित आहेत आणि त्यांच्याकडे अभियांत्रिकीची पदवीदेखील आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय एनडीए स्तरावर घेतला जाईल आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्री नितीशकुमारच घेतील.
आमदार रजक म्हणाले की, पक्षाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते देखील निशांत कुमार यांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छितात, परंतु आघाडीचा धर्म पाळणे आवश्यक आहे आणि सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन चालावे लागेल. मुख्यमंत्रीपदासाठी सम्राट चौधरी यांच्यासह इतर अनेक नेते देखील सक्षम आहेत. जदयूचे मुख्य प्रवक्ते नीरजकुमार यांनीही या सुरात सूर मिसळून एक मोठे विधान केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, वैयक्तिकरीत्या त्यांचीही इच्छा आहे की, ‘निशांत कुमार मुख्यमंत्री व्हावेत.’
निशांतकुमार यांचे ‘भावी मुख्यमंत्री’ पोस्टर
पाटणा शहराच्या रस्त्यांवर निशांतकुमार यांना ‘बिहारचे भावी मुख्यमंत्री’ असे दर्शवणारे पोस्टर लागले आहेत. पोस्टरमध्ये वरच्या बाजूला नीतीशकुमार यांच्या फोटोसोबत लिहिले आहे की, नीतीश सेवक – मांगे निशांत आणि मध्यभागी प्रश्न विचारला आहे की, तुम्ही असा विचार का करत आहात. जेव्हा बिहारच्या लोकांना मान्य नाही, की तुम्ही बिहारचे मुख्यमंत्री पद सोडून जावे, याखाली जेडीयूचे पुन्हा एकदा राष्ट्रीय अधक्ष बनल्याबद्दल आणि पक्षाचे सर्वमान्य नेते म्हणून नीतीशकुमार यांचा उल्लेख करत त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यात आला.





























































