
संघ आणि भाजपचा लोकशाहीवर विश्वास नाही. भाजप नेत्यांच्या वक्तव्यावरून विरोधक संपवण्याच्या त्यांचा मनसुबा स्पष्ट दिसून येत आहे. पण, लोकशाहीची जननी असलेल्या बिहारमध्ये आम्ही भाजपचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही. बिहारची जनता भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. भाजप बिहारमध्ये एकट्याने निवडणूक लढू शकत नाही. बिहारमध्ये त्यांचा सर्व अहंकार मोडून काढला जाईल. लोकं त्यांना त्यांची जागा दाखवतील. हिम्मत असेल तर भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी असे आव्हान बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी भाजपला दिले आहे. हिंदुस्थानात भाजप हा एकच पक्ष टिकेल या भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला.
यावेळी ते म्हणाले की भाजप लोकशाहीसाठी धोकादायक आहे. लोकशाही संपवण्याची भाषा भाजपचे लोक करतात. मात्र बिहारची जनता हे मान्य करणार नाही. केवळ सत्ताधारी पक्षातूनच लोकशाही चालत नाही, तर लोकशाहीत विरोधकांची भूमिका महत्त्वाची असते. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्र सरकार केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशाचे कोट्यवधी घेऊन फरार झालेल्यांना शोधण्यात केंद्र सरकार असमर्थ आहे, असेही ते म्हणाले.






















































