
बिहारमध्ये भावकीत जमीनीवरून झालेल्या वादातून दंगल व एकाच्या हत्येच्या गुह्यात सहभागी असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पकडले आणि त्याला पकडी दयाल पोलिसांच्या ताब्यात दिले. प्रिन्सकुमार सिंग (32) असे त्या आरोपीचे नाव आहे.
बिहारच्या इस्ट चंपाला जिह्यातील धनवजी गावचा तो रहिवाशी आहे. प्रिन्सकुमारच्या भावकीमध्ये जमीनीवरून जुना वाद आहे. 4 मे रोजी पुन्हा वाद झाला आणि प्रिन्स, त्याचे वडील, काका, चुलत भावांनी मिळून समोरच्यांशी मारामारी केली. तेव्हा यांच्या मारहाणीत एकाची हत्या तर दुसरा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी पकडी दयाल पोलिसांनी हत्या, हत्येचा प्रयत्न व दंगलीचा गुन्हा दाखल करून पाच जणांना पकडले होते. मात्र प्रिन्स आणि अन्य चौघे फरार झाले होते. दरम्यान हत्येच्या गुह्यातील एक आरोपी फाऊंटन हाँटलजवळील महाराजा नर्सरीमध्ये लपून राहत असल्याची माहिती उपनिरीक्षक शिवाजी सावंत यांना मिळाली. त्यानुसार प्रभारी निरीक्षक योगेश चव्हाण, एपीआय वंजारी व सावंत यांनी त्या नर्सरीत धडक देऊन प्रिन्सकुमार पकडले. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार प्रिन्सला पकडी दयाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.




























































