नगरमध्ये उड्डाणपुलाच्या कठडय़ाला धडकली दुचाकी; तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर शहरात नव्याने झालेल्या उड्डाणपुलावरील अपघाताची मालिका सुरूच असून, आज सकाळी पुन्हा भीषण अपघात होऊन 28 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची 25 वर्षीय पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या तरुणाची दुचाकी उड्डाणपुलाच्या कठडय़ाला धडकल्याने तो पुलावरून खाली कोसळला. त्याची पत्नी मात्र पुलाच्या कठडय़ाला अडकल्याने वाचली. या घटनेची भिंगार पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.

किशोर जिजाबा गायकवाड (वय 28, रा. इंदापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे, तर चित्रा किशोर गायकवाड (वय 25) असे जखमी पत्नीचे नाव आहे. किशोर आणि चित्रा हे दोघे दुचाकीने छत्रपती संभाजीनगरहून नगरमार्गे पुण्याकडे जात होते. आज सकाळी सात वाजेच्या सुमारास ते नगरमधील स्टेट बँक चौक ते चांदणी चौक या रस्त्यावरील उड्डाणपुलावरून जात असताना त्याला वेगात असलेली दुचाकी नियंत्रित करता आली नाही. उड्डाणपुलाच्या कठडय़ाला दुचाकी धडकल्याने किशोर पुलावरून खाली पडला. यामध्ये तो जागीच मृत झाला, तर चित्रा पुलाच्या कठडय़ाला अडकल्याने ती वाचली; पण या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.