व्रतासाठी काहीपण! व्रत तुटू नये म्हणून ती चालत्या बाईकवर उभी राहिली

सामना ऑनलाईन । जोधपूर

हिंदुस्थानी स्त्रीच्या आयुष्यात व्रतवैकल्यांना अपार महत्त्व आहे. आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, कुटुंबात सौख्य नांदावं म्हणून व्रत करण्याची परंपरा जोपासली जाते. सध्याच्या युगात व्रतवैकल्याची परंपरा काहीशी मागे पडली असली तरी ते अगदी प्राणपणाने पूर्ण करणाऱ्यांचीही काही कमी नाही. असाच एक प्रकार सध्या पाहायला मिळत आहे. एक स्त्री चालत्या बाईकवर उभी राहून व्रत पूर्ण करत असल्याच्या घटनेने चांगलीच खळबळ उडाली आहे.

जोधपूर शहरात बाइक चालवणाऱ्याच्या मागे ही महिला उभी होती. ते पाहून आधी अनेकांना हा बाइक स्टंट असल्याचे वाटले होते. मात्र, हा बाइक स्टंट नसून चंद्र दिसेपर्यंत उभे राहण्याचे व्रत आहे. या व्रताला उबछट म्हणतात. पतीच्या दीर्घायु आणि निरोगी आयुष्यासाठी पत्नी सूर्यास्तानंतर चंद्रदर्शन होईपर्यंत बसत नाही. या व्रताचे पालन राजस्थान आणि उत्तर हिंदुस्थानात केले जाते.

जोधपूरमध्ये एका महिलेने हे व्रत केले होते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे उशीरापर्यंत चंद्रदर्शन झाले नाही. ती महिला खरेदीसाठी बाजारात गेली होती. अखेर घरी जाण्याची घाई असल्याने तिने भन्नाट उपाय शोधून काढला. तिने बाइक घेऊन नवऱ्याला बोलावले आणि ती महिला नवऱ्याच्या बाइकवर मागे बसली नाही. तर फूटरेस्टवर उभी राहिली. आपल्यासाठी बायको व्रत करत आहे, याची जाणीव असल्याने नवराही रस्त्यावरील खड्डे चुकवत धीम्या गतीने काळजी घेत बाइक चालवत होता. अशा प्रकारे ते घरी पोहचले. त्यानंतर घरातील कामे आवरल्यावर चंद्रदेवाने त्यांच्यावर कृपा केली. ढगांनी झाकलेल्या चंद्राचे १२.२० वाजता दर्शन झाले आणि महिलांनी त्यांचे व्रत सोडले. व्रत पूर्ण करण्यासाठी महिलेने केलेला हा स्टंट राजस्थानात चर्चेचा विषय झाला आहे.