
सातारा जिल्ह्यासह सांगली, पुणे येथील दुचाकीचोरी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने एकाला अटक केली असून, दुसरा अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेतले आहे.
संशयितांकडून 10 दुचाकी जप्त केल्या आहेत. विकास मुरलीधर मुळे (रा. मंगळवार पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पथक गस्त घालत असताना दोघेजण सदरबझार परिसरात दुचाकीवर संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना पकडल्यानंतर कागदपत्रांबाबत विचारणा केली असता, त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
संशयितांनी सातारा शहर, कराड, सांगली व पुणे येथून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तब्बल 10 दुचाकी जप्त केल्या.
संशयितांनी आणखी दुचाकी चोरल्याची शक्यताही निर्माण झाली आहे. पोलिसांनी गुन्हे दाखलबाबत माहिती घेत असताना सापडलेल्या दुचाकीपैकी सहा गुन्हे दाखल आहेत. आणखी चार गुन्हे कुठे दाखल आहेत, याची माहिती पोलीस घेत आहेत.
जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार नानासाहेब कदम, पोलीस हवालदार प्रशांत शेवाळे, गुलाब भोसले, विजय गायकवाड, गणेश घाडगे, अभय साबळे, संतोष कचरे, गणेश भोंग यांनी कारवाईत सहभाग घेतला.






















































