
गुजरातमध्ये 2002मध्ये झालेल्या दंगलीत सामूहिक बलात्काराची बळी ठरलेल्या बिल्कीस बानो या पीडितेला घर, शासकीय नोकरी आणि 50 लाख रुपये भरपाई द्यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला दिला आहे. या आदेशाची अंमलबजावणी पुढील दोन आठवड्यातच व्हावी असं न्यायालयाने नमूद केलं आहे. 2019च्या एप्रिल महिन्यातच या संबंधीचे आदेश देऊनही गुजरात सरकारने भरपाई देण्यास विलंब केल्याने दोन आठवड्यांची मुदत न्यायालयाने दिली आहे.
गुजरातमध्ये 2002ला गोध्रा जळीतकांडानंतर दंगल उसळली होती. अहमदाबादनजीकच्या रांधिकपूर येथे 3 मार्च 2002 रोजी जमावाने बिल्कीस बानो यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. तेव्हा 21 वर्षांच्या असलेल्या बिल्कीस पाच महिन्यांच्या गरोदर होत्या. त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यांच्या कुटुंबातील सात लोकांचा दंगलीत मृत्यू झाला.
या प्रकरणी बिल्किस यांच्या तक्रारीवरून तपास सुरू करण्यात आला होता. अहमदाबाद येथे साक्षीदारांना धोका असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हा खटला मुंबईत ऑगस्ट 2004मध्ये हस्तांतरित केला. मुंबईतील विशेष न्यायालयाने या प्रकरणात बानो यांच्यावरील बलात्कार आणि कुटुंबातील सातजणांच्या हत्येबद्दल 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तर पोलीस आणि डॉक्टर यांच्यासह सातजणांची सुटका केली होती.





























































