‘त्या’ हैवान देशांना रोखण्यासाठी ‘UN’सारखी नवी संघटना बनवा, बिल गेटस यांचे महासत्तांना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मानवतेलाच धोक्यात टाकणारी संशोधने करून प्रयोगशाळेत जीवघेण्या विषाणूंची जैविक अस्त्रे बनवणाऱ्या हैवान देशांना रोखायलाच हवे. त्यासाठी जगातील श्रीमंत देशांनी पुढाकार घेऊन संयुक्त राष्ट्रांसारखी (यूएन) नवी प्रभावी संस्था स्थापन करावी, असे आवाहन मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातील दानशूर श्रीमंतांच्या यादीतील अग्रगण्य उद्योजक बिल गेटस यांनी केले आहे. जर एखादा आक्रमक देश स्वार्थासाठी कोरोनासारखा जीवघेणा विषाणू प्रयोगशाळेत बनवत असेल तर जगातील सर्वच देशांनी एकजूट होऊन त्या देशाला रोखावे असे परखड मत मांडून मानवता आता उद्भवलेल्या महामारीवर निश्चितच विजय मिळवेल असा विश्वासही गेटस यांनी व्यक्त केला.

दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील सर्व देशांनी एकजूट होऊन संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना केली होती. त्यामुळेच जगातील युद्धे आणि तंटेबखेडे यावर आपल्याला नियंत्रण मिळवता आले होते. आजच्या घडीला मानवताविरोधी जैविक अस्त्रांतील जीवघेण्या विषाणूंविरोधात जगाला पुन्हा एकजूट व्हायचे आहे. त्यासाठीच अशी अस्त्रे तयार करणाऱ्या देशांच्या मुसक्या जगणे आवळायला हव्यात. अशा जीवघेण्या विषाणूंविरोधात खंबीरपणे लढण्यासाठी नव्या प्रभावी संघटनेची स्थापना करायलाच हवी असे आग्रही मत बिल गेटस यांनी मांडले.

ते म्हणाले, कोविड-19 महामारीने जगाला एक आगळा धडाच दिला आहे. आता आपण सर्वांनी सावध होत अशा मानवनिर्मित आणि नैसर्गिक रोगांच्या महामारीला तोंड देण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना शोधावी. श्रीमंत देशांनी गरीब देशांना पुन्हा सावरण्यासाठी मानवतेच्या भावनेतून मदत करावी असे माझे मत आहे.

संशोधकांनी प्रभावी विषाणूविरोधी संशोधन प्रयोगशाळा उभारावी
कोरोना विषाणूने लागलेली ठेच आपण विसरून चालणार नाही. जगावर विषाणू आणि व्हायरसची महामारी कधीनाकधी येणारच. मानवजातीने भविष्यातील या संकटाला तोंड देण्यासाठी कायम तयार राहायला हवेय असे सांगून गेटस म्हणाले, आपण सर्वांनी सावध होऊन जगातील हायटेक अँटिव्हायरल प्रयोगशाळा उभारायला हवी. त्यासाठी मी मला शक्य होईल तेवढी मदत करायला तयार आहे. जगातील संशोधक आपले कसब पणाला लावून ही प्रयोगशाळा चालवतील आणि भविष्यात कॅन्सरसारख्या भयानक रोगालाही आळा घालण्यासाठी प्रभावी लस तयार करतील असा विश्वास गेटस यांनी बोलून दाखवला.

‘आता जगभरातील देशांत लॉकडाऊन उठेल, पण बाबांनो, कानात वारे शिरलेल्या वासरांसारखे उंडारू नका. कोरोनावरची प्रभावी लस येईपर्यंत सामाजिक दुरी आणि अन्य प्रतिबंधात्मक उपाय सुरु ठेवा ही जगातील नागरिकांना माझी कळकळीची विनंती आहे’, असे बिल गेटस म्हणाले.