
सामना प्रतिनिधी, पुणे
दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी पुण्याजवळ औंध मिलिटरी स्टेशनच्या परिसरात उभारलेल्या निमशहरी शिवनेरी गावात चित्याच्या चपळाईने सैनिकांनी एका दहशतवाद्याला जिवंतपणे पकडले अन् उर्वरित दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यामुळे मोठ्या जीवितहानीपासून गाव वाचले. शिवनेरीमध्ये गेल्या सात दिवसांपासून बिम्सटेक या पाच देशांच्या मिलेक्स 2018 या पहिल्या संयुक्त युद्धसरावाचा आज ‘ऑपरेशन टायगर’ने समारोप झाला. त्यावेळी ही थरारक युद्धसदृश परिस्थिती उपस्थितांनी अनुभवली.
सर्व नागरिकांना एका ठिकाणी जमा होण्याच्या सूचना लाऊडस्पीकरकरून देण्यात येतात.. आणि सुरू होतो बिम्सटेक राष्ट्रांच्या सैनिकी तुकड्यांचा दहशतवाद्यांशी सामना.. अवघ्या काही मिनिटांत एका दहशतवाद्याला जिकंत पकडून तर उरलेल्यांना यमसदनी धाडून ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी केले जाते. याच वेळी बॉम्ब डिस्पोजल पथक आणि लष्कराचे डॉग स्क्वॉडने स्फोटकांचा साठा निष्क्रिय केला. शिवनेरी गावात सात दिवसांपासून सुरू असलेल्या बिम्सटेक (बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल ऍण्ड इकॉनॉमिक को-ऑपरेशन) राष्ट्रांचा संयुक्त लष्करी युद्धसराव आयोजित केला होता. यावेळी सरंक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत, लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी, बिम्सटेकचे सचिक शाहिदुल इस्लाम तसेच सदस्य राष्ट्रांचे सैन्यदल प्रमुख उपस्थित होते.
या लष्करी सरावात हिंदुस्थानसह श्रीलंका, भूतान, म्यानमार, बांगलादेश या राष्ट्रांच्या सैन्यदलाने भाग घेतला होता. बिम्सटेकच्या सदस्य राष्ट्रांपैकी नेपाळ आणि थायलंड या देशांनी प्रत्यक्ष सरावात भाग घेतला नसला तरी या देशांचे निरीक्षक उपस्थित होते. प्रत्येक देशाकडून 30 सैनिकांची तुकडी यामध्ये सहभागी झाली होती.
‘उपखंडातील कोणत्याही राष्ट्रांना संघटनेची ताकद दाखवण्यासाठी या सरावाचे आयोजन करण्यात आलेले नाही. दहशतवाद ही जागतिक समस्या असून प्रत्येक देशाला तिचा सामना करावा लागत आहे. बिम्सटेक संघटना ही सदस्य राष्ट्रांमध्ये माहिती-तंत्रज्ञान, आर्थिक सहकार्य, गरिबीपासून मुक्तता अशा विविध विषयांकर काम करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. दहशतवादाचा धोका लक्षात घेता संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याची आवश्यकता वाटल्याने या सरावाच्या आयोजनात हिंदुस्थानने पुढाकार घेतला आहे.
-डॉ. सुभाष भामरे, सरंक्षण राज्यमंत्री
‘बिम्सटेक गटातील प्रत्येक राष्ट्र दहशतवादाचा मुकाबला करण्यास खंबीर असून प्रत्येकाचा अनुभव वाटून घेण्यासाठी आणि आवश्यक असे कौशल्य आत्मसात करण्यासाठी या सरावाचे आयोजन करण्यात आले होते. विविध देशांतील दहशतवादी गट घातपात कारवायांसाठी परस्परांशी संपर्क साधतात. ही बाब विचारात घेऊन दहशतवादाचा सामना करण्यासाठी सदस्य देशांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. त्यासाठीच या सरावाचे आयोजन केले होते.’
-जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख
summary- bimstec mock encounters successful at pune






























































