
बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण भरले असून यावर्षी पाऊस चांगला झाल्याने धरण भरले आहे. धरण भरल्यामुळे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी जलपूजन करून आगामी काळात बीड शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी बिंदुसरा धरण भरल्याने श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून जलपूजन केले. लवकरच सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी पात्रालगत असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन त्यांनी केले. नदीकाठी असलेल्या नागरिकांनी तात्काळ स्थलांतर करण्याचे आवाहनही करण्यात आले. सर्व नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात येत असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. आगामी काळात बीड शहराला पिण्याचे मुबलक पाणी मिळेल आणि पाण्याचा प्रश्न मिटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. योग्य नियोजन करून पाणी पुरवठा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.उत्कर्ष गुट्टे, पाणीपुरवठा सभापती रविंद्र कदम, नगरसेवक गणेश वाघमारे यांच्यासह नगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी कोरोना रोखण्यासाठीचे नियम पाळून हा जलपूजनाचा कार्यक्रम करण्यात आला.


































































