
पालिका कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी पगाराला लिंक केल्यामुळे होणाऱ्या गोंधळात पालिका प्रशासनाकडून पगार रोखण्याचे प्रकार सुरूच असून ‘डी’ विभागातील कर्मचाऱ्यांना महिनाभर काम करूनही फक्त 290 रुपयांपासून 500, 1000-4500 रुपयांपर्यंत पगार आल्याचे समोर आले आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत हा प्रकार घडल्याने 500 हून जास्त सफाई कामगार हवालदिल झाले आहेत. पालिका प्रशासनाच्या या हलगर्जी कारभाराविरोधात सफाई कामगार उद्या 5 ऑक्टोबर रोजी ग्रॅण्ट रोड येथील पालिकेच्या विभाग कार्यालयावर जोरदार आंदोलन करणार आहेत.
बायोमेट्रिक यंत्रणेमध्ये वेळेवर हजेरी नोंदवूनही गैरहजर म्हणून नोंद होत असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. शिवाय दिवस भरूनही गैरहजर नोंद होत झाल्याचे प्रकारही घडले आहेत. या गोंधळामुळे सर्व 24 विभागांतील हजारो कर्मचाऱ्यांना 100 ते 500 रुपयांपर्यंत पगार आल्याचे प्रकारही याआधी घडले आहेत. या पार्श्वभूमीवर समन्वय समितीने आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर पालिका आयुक्तांनी ऑगस्टमध्ये समन्वय समितीसोबत झालेल्या बैठकीत नोव्हेंबरपर्यंत बायोमेट्रिक हजेरीतील त्रुटी दूर करू आणि तोपर्यंत कुणाचाही पगार रोखणार नाही असे आश्वासन दिले होते, मात्र सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातही पगार रोखल्याचे प्रकार सुरूच असल्याचे म्युनिसिपल मजदूर युनियनचे संघटक प्रवीण मांजलकर यांनी दिली.
पूरग्रस्त भागांत मदत करणाऱ्यांचाही पगार कापला
विशेष म्हणजे सांगली, मिरज, कुपवाडा, कोल्हापूरसारख्या पूरग्रस्त भागांत मदतकार्य करण्यास गेलेल्या कामगारांचा पगारही यावेळी कापण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा सर्व 24 विभागांत जोरदार आंदोलन करण्यात येईल, असेही मांजलकर यांनी सांगितले.
‘डी’ विभागातील कर्मचाऱयांचा पगार का रोखला आहे याची तपासणी करण्यात येईल. बायोमेट्रिकमधील तांत्रिक कारणाने पगार रोखला गेला असेल तर तो तातडीने देण्यात येईल आणि जर पगार रोखण्याला पालिका अधिकारी कारणीभूत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. – प्रवीण परदेशी, पालिका आयुक्त























































