नगरसेवकांचीही लागणार बायोमेट्रिक हजेरी, दांडीबहाद्दरांना चाप बसणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-building

सामना प्रतिनिधी । मुंबई

पालिकेच्या महासभेसाठी येणाऱया नगरसेवकांचीही आता बायोमेट्रिक हजेरी लागणार आहे. विशेष म्हणजे यावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. यामुळे पालिका सभागृहाच्या बाहेर ठेवण्यात येणाऱया हजेरी बुकवर सही करून पळ काढणाऱया दांडीबहाद्दर नगरसेवकांना चाप बसणार आहे. या बायोमेट्रिक हजेरीतून महापौर, उपमहापौर यांना वगळण्यात आले आहे.

पालिकेच्या सभागृहात मुंबईच्या भवितव्याबाबत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून निर्णय घेतले जातात, विकासकामे मंजूर केली जातात, धोरणात्मक निर्णयही घेतले जातात. अशा वेळी नगरसेवकांची हजेरी अत्यंत महत्त्वाची असते. केवळ हजेरीच नाही तर पुरेशी संख्याही महत्त्वाची असते. पक्षाची धोरणे मंजूर होणे नगरसेवकांच्या उपस्थितीवर अवलंबून असतात. या पार्श्वभूमीवर पालिका सभागृहाच्या बैठकीला उपस्थित राहणाऱया नगरसेवकांना सभागृहाबाहेरील नोंदवहीमध्ये सही करून प्रवेश दिला जातो. परंतु अनेक वेळा नगरसेवक येथे हजर नसतात, तर काही नगरसेवक केवळ नोंदवहीत हजेरी लावून परस्पर घरी निघून जातात. अशा वेळी महत्त्वाच्या निर्णयावर निर्णय घेताना राजकीय पक्षास अडचणीस सामोरे जावे लागते. अनेकदा काही नगरसेवक दोन दिवसांनंतर येऊन नोंदवहीत सही करतात, असे आरोपही करण्यात येतात.

…म्हणूनच घेतला निर्णय

मुंबईतील समस्यांचे निराकरण करण्यासाठी मतदार नगरसेवकांना निवडून देतात, मात्र काही नगरसेवकांना सभागृहातील कामकाजाची माहितीही नसते. याचा परिणाम विकासावर होतो. त्यामुळे सभागृहाच्या दरवाजावर बायोमेट्रिक मशीन व सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात यावी अशी मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली होती. महापौरांनी ही मागणी मंजूर करून पालिका आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवली. आयुक्त अजोय मेहता यांनी यावर सकारात्मक अभिप्राय देताना सीसीटीव्ही यंत्रणा व बायोमेट्रिक मशीन लावण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले आहेत.