
मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेले एक अनमोल नक्षत्रांचे देणे म्हणजे अभिनेत्री रंजना देशमुख. देखणा चेहरा, अभिनयातील विविधता, सुरेख संवादशैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रुपेरी पडदा गाजवणाऱया या अभिनेत्रीचा जीवनप्रवास आता ‘रंजना – अनपह्ल्ड’ या बायोपिकमधून उलगडणार आहे.
23 जुलै रोजी असलेल्या अभिनेत्री रंजना देशमुख यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ‘रंजना – अनफोल्ड’ मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपटात रंजना यांची भूमिका कोण साकारणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
कार्निव्हल ग्रुपचे चेअरमन डॉ. श्रीकांत भासी हे या चित्रपटाची प्रस्तुती करणार असून कार्निव्हल मोशन पिक्चर्स आणि वैशाली सरवणकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजित मोहन वारंग हे या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन करणार आहेत. लवकरच चित्रीकरणाला सुरुवात करून 3 मार्च 2023 रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
मुंबईतच जन्मलेल्या रंजना यांनी 1960 ते 2000 पर्यंत विविध व्यक्तिरेखा साकारत मराठी रसिकांचे मनोरंजन केले. वयाच्या पाचव्या वर्षीच ‘हरिश्चंद्र तारामती’ या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून काम करत त्या सिनेसृष्टीत दाखल झाल्या. तरुणपणी ‘असला नवरा नको गं बाई’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत त्यांनी कौतुकाची थाप मिळवली. त्यानंतर ‘मुंबईचा फौजदार’, ‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘गुपचुप गुपचुप’, ‘बहुरूपी’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘खिचडी’ अशा वेगवेगळ्या विषयांवर आधारलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारत त्यांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले. ‘लेडी कॉमेडियन’ म्हणूनदेखील त्यांना ओळखले जाते.
रंजना आज या जगात नसल्या तरी त्यांच्या अविस्मरणीय कलाकृतींच्या माध्यमातून त्या आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत. आता पुन्हा एकदा त्या बायोपिकच्या रूपात मराठी रसिकांसमोर येणार आहेत.






























































