
जनरल बिपीन रावत यांचे डिसेंबर महिन्याशी विशेष नाते राहिले आहे. डिसेंबरमध्येच ते अधिकारी, उच्चाधिकारी, महत्तम अधिकारी पदावर पोहोचले होते. हिंदुस्थानी सैन्यदलातील सर्वोच्च असे सीडीएस पदही त्यांना डिसेंबरमध्येच मिळाले. दुर्दैवाने याच डिसेंबर महिन्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
16 डिसेंबरला बनले लष्करात अधिकारी
बिपिन रावत हे लष्करात पहिल्यांदा अधिकारी बनले ती तारीख होती 16 डिसेंबर 1978. त्या दिवशी 11 गोरखा रायफल्सच्या पाचव्या बटालियनमध्ये त्यांना कमिशन ऑफिसर बनवले गेले होते.
16 डिसेंबरलाच मिळाली लेफ्टनंट आणि मेजर पदाची जबाबदारी
- 16 डिसेंबर 1980 रोजी बिपिन रावत यांची लष्करात लेफ्टनंट पदावर बढती मिळाली. त्यानंतर नऊ वर्षांनी डिसेंबर महिना त्यांच्यासाठी पुन्हा लकी ठरला. 16 डिसेंबर 1989 रोजी ते मेजर बनले होते.
- कमांडर ग्रेडमध्ये बढतीही डिसेंबरमध्येच
- रावत यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची लष्कराच्या आर्मी कमांडर ग्रेडमध्ये बढती झाली. त्याची घोषणाही 2015 च्या डिसेंबरमध्येच झाली होती.
डिसेंबरमध्येच गळ्यात पडली लष्करप्रमुख पदाची माळ
1 सप्टेंबर 2016 रोजी त्यांना लष्कर उपप्रमुख बनवण्यात आले होते. परंतु त्या पदावत ते फक्त दोनच महिने राहिले. कारण त्यानंतरच्या डिसेंबरमध्ये त्यांच्या गळ्यात लष्करप्रमुख पदाची माळ पडली. 17 डिसेंबर 2016 रोजी ते देशाचे लष्करप्रमुख बनले.
पहिले सीडीएसही डिसेंबरमध्येच
देशाचे पहिले सीडीएस म्हणून रावत यांनी कारभार स्वीकारला तो डिसेंबर महिन्यामध्येच. 30 डिसेंबर 2019 रोजी निवृत्तीच्या एक दिवस आधीच त्यांनी या पदाचा कारभार स्वीकारला आणि 31 डिसेंबरपासूनच सीडीएस म्हणून काम सुरू केले.
शेवटचा श्वासही डिसेंबरमध्ये
आयुष्याच्या कारकिर्दीत सतत लकी ठरलेला डिसेंबर महिना यंदा मात्र रावत यांच्यासाठी दुर्दैवी ठरला. हेलिकॉप्टर दुर्घटनेत अन्य 12 लष्करी अधिकाऱयांसह रावत यांनी अखेरचा श्वास घेतला.


























































