स्वगीर्य सौंदर्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विद्या कुलकर्णी

हिमालयातील शुभ्र बर्फात त्याचे चमकदार रंग अगदी खुलून दिसतात. मोनल पक्ष्यांचे हे सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातील पक्षीप्रेमी येथे येतात.

हिमालयन मोनल
चोपटा हे अतिशय निसर्गरम्य असे हिमालयातील 2680 मीटर्स उंचीवर वसलेले छोटेसे गाव आहे. या गावात अजूनही इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली नाही, सोलर ऊर्जेवर सर्व व्यवहार चालतात. परंतु मिनी स्वीत्झर्लंड अशी ख्याती असलेल्या या गावात जगभरातून ‘मोनल’ हे पक्षी पाहण्यासाठी पर्यटक येतात. सकाळच्या वेळी सूर्य उगवण्याच्या आधी बाहेर पडल्यास इंद्रधनुष्याप्रमाणे चमकदार रंगातील मोनल पक्ष्यांच्या जोडय़ा खाद्य शोधण्यासाठी डोंगरांवर व रानावनात फिरताना दिसतात. मोठे कॅमेरे घेऊन पक्षीप्रेमी त्यांचा मागोवा घेत फोटो काढतात.

मोनल पक्ष्याला उत्तराखंडाचा राज्य पक्षी असा सन्मान मिळाला आहे. तो नेपाळचा राष्ट्रीय पक्षी असून नेपाळी गाण्यांमध्ये त्याचा वारंवार उल्लेख असतो. हिमालयन मोनल पक्षी फॅसिनिडी कुटुंबातील तितर जातीतील आहेत. त्यांचे वास्तव्य अफगाणिस्तान व हिंदुस्थान, नेपाळ, दक्षिणी तिबेट आणि भुतानमधील हिमालय पर्वतरांगांत आहे. पाकिस्तानात खैबर पख्तुनवा प्रांत आणि काघन, पलास व्हॅली आणि आझाद कश्मीरमध्येही त्यांचे वास्तव्य आहे. या पक्ष्यांचा वावर समुद्रसपाटीपासून 2400 ते 4500 मीटर्स उंचीवर, समशीतोष्ण ओक-शंकूच्या जंगलात, बांबू आणि रोडोडेंड्रॉन जंगलात, खुल्या गवताळ, अल्पाइन कुरण येथे असतो. त्यामुळे त्यांना उबदार राहण्यास मदत होते. हिवाळ्यामध्ये 2000 मीटर्स उंचीपर्यंतच्या प्रदेशात स्थलांतर करीत असले, तरी हिमवर्षावातसुद्धा हे पक्षी राहू शकतात.

मोनल पक्ष्याच्या नराचे पंख निळ्या, जांभळ्या रंगांच्या छटेत असून खालील बाजू लालसर तांब्याच्या रंगाची असते. आतील बाजूस गडद तपकिरी काळ्या रंगाची पिसे असतात. शेपटीची पिसे लालसर तपकिरी असून टोकापर्यंत गडद होत जातात. नराचे डोके चमकदार हिरव्या रंगाचे असून डोळय़ांभोवती निळसर वर्तुळ असते. मान लालसर तपकिरी असून मानेवर एक पिवळा पॅच असतो. डोक्यावरील मुकुट धातूसारख्या हिरव्या रंगाचा असून तुरा लांब व चिंचोळा असतो. पार्श्वभाग पांढऱया रंगाचा असून पक्षी उडत असताना दिसून येतो. मादीचे पंख गडद तपकिरी रंगाचे असून मादीच्या संपूर्ण अंगावर पांढऱया पट्टय़ा असतात व शेपटीच्या पिसांची टोके गडद असतात. मादीचा गळा पांढऱया रंगाचा असून डोक्यावर छोटा तुरा असतो. त्यावर चमच्याच्या आकाराची पिसे असतात. मादीच्या डोळ्यांभोवती निळसर हिरव्या रंगाचे वर्तुळ असते. पहिल्या वर्षातील पिल्ले मादीसारखी दिसतात.

या पक्ष्यांचे खाद्य झाडांची मुळे व अपृष्ठवंशीय प्राणी असते. उन्हाळी हंगामात हे पक्षी उंच वृक्षांच्या शेंडय़ावर, खडकाळ प्रदेशांत आणि गवताच्या झाडावर बसलेले दिसतात. डोंगराळ प्रदेशात टणक मातीत, दगडात हे पक्षी बियाणं, कोंब, अंकुर, झाडाचे अन्य भाग, किडे, सरपटणारे प्राणी शोधतात. या पक्ष्यांची चोच लांब, बाकदार व पाय बळकट असल्यामुळे माती खणून खाद्य शोधणे त्यांना जमू शकते. त्यांच्या बळकट पायांमुळे 25 सें.मी.पर्यंत खड्डा खणू शकतात. चोचीमुळे कठीण झाडाचे भागसुद्धा दुभंगू शकतात. या पक्ष्यांची साद कर्कश्य आवाजात कोरल पक्ष्यासारखी असते. या पक्ष्यांचा प्रजननाचा काळ एप्रिल ते ऑगस्ट असून या काळात मादी मोठय़ा संख्येने (20 ते 30) एकत्र येऊन खाद्य शोधताना दिसतात व नर मात्र 2 ते 3 च्या संख्येने एकत्र दिसतात. या पक्ष्यांची साद वेगवेगळ्या ढंगाची ‘आक्रमक, आनंद, धोक्याची सूचना देणारी’ एकमेकांना आकर्षक करणारीही असते. प्रजननाच्या काळात वेगवेगळी साद घालून नर-मादी एकमेकांना आकर्षित करतात. डोकं वर-खाली करून, शेपटी उडवून पंख फडफडवतात. मादीला नर पसंत पडल्यावर जमीन खणून घरटे बांधतात. मादी एकावेळी 3 ते 5 अंडी देते. या पक्ष्यांची अंडी मोठी असतात. ती अंडी बदामी रंगाची असून त्यावर तपकिरी रंगाचे ठिपके असतात. अंडी उबवण्याचे काम मादी करते. नर घरटय़ाचे रक्षण करतो. 27 ते 30 दिवसांनंतर पिले बाहेर पडल्यावर नर ‘शिकारी पक्षी, मोठे प्राणी व माणसांपासून’ पिलांचे संरक्षण करतो. सहा महिन्यांनंतर पिले स्वतंत्र होऊन आपले खाद्य शोधू शकतात. शिशु पिले मादीसारखी दिसतात.

वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या बनवण्यासाठी या पक्ष्यांचे रंगीबेरंगी पंख, त्यांच्या त्वचेचा उपयोग केला जातो हे ऐकून फार वाईट वाटले व मनात विचार आला मनुष्यप्राणी इतका स्वार्थी कसा होऊ शकतो?

पहाटेच्या थंडीत कुडकुडत बाहेर पडून या स्वर्गीय पक्ष्याचे फोटो काढून माझे मन भारावून गेले, जणूकाही निसर्गाने त्याचे सुंदर स्वप्नच साकार केल्यासारखे वाटले! आजच्या लेखानंतर मी आपल्या सर्वांचा निरोप घेणार आहे. माझे मन संमिश्र भावनेने भावुक झाले आहे, योग आल्यास परत असेच बरेच पक्षी घेऊन तुमच्या भेटीस येईन नक्की!

[email protected]