आता टेन्शन बर्ड फ्लूचे, 12 वर्षांच्या मुलाचा दिल्लीत मृत्यू

कोरोना महामारीचा धोका संपला नसतानाच देशात बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. H5N1 एवियन इन्फ्लुएंजा व्हायरस म्हणजे बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याने 12 वर्षीय मुलाचा दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे टेन्शन वाढले आहे.

कोंबडय़ांमध्ये या व्हायरसची पहिल्यांदा लागण होते. त्यानंतर कोंबडय़ा मृत्युमुखी पडतात. व्हायरसची लागण झालेल्या कोंबडय़ांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला लागण होऊ शकते. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हरयाणातील 12 वर्षांच्या मुलाला एम्समध्ये दाखल केले होते. बर्ड फ्लूची लक्षणे दिसल्यानंतर त्याचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी येथे पाठविण्यात आले. बर्ड फ्लूची लागण झाल्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला. उपचार सुरू असताना त्या मुलाचा मृत्यू झाल्याचे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.

लक्षणे

  • ताप
  • डोकेदुखी, अंगदुखी
  • श्वासोच्छवास घेण्यास त्रास
  • कफ, सर्दी
  • घसादुखी
  • डायरिया

पोल्ट्री प्रॉडक्ट चांगले शिजवूनच खा

  • कोंबडय़ांपासून बर्ड फ्लूची लागण होते; पण जर एका व्यक्तीला संसर्ग झाला तर संपका&तील दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होतो याचे ठोस पुरावे नाहीत. मात्र, पोल्ट्री व्यवसायातील लोकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन ‘एम्स’चे मेडिसिन विभागप्रमुख डॉ. निरज निश्चल यांनी सांगितले.
  • चिकन, अंडी आदी पोल्ट्री प्रॉडक्ट खाण्यापूर्वी ते चांगले शिजवून घ्या. विशिष्ट तापमानात हा व्हायरस मरतो. त्यामुळे घाबरून जाऊ नये असे डॉ. निश्चल म्हणाले.
आपली प्रतिक्रिया द्या