
>>डॉ. अनिल कुलकर्णी
जव्हारच्या जिल्हा परिषद शाळांतील मुले-मुली जंगलाबरोबर वाढतात. त्यांना जंगलाची भाषा कळते. त्यांना बाफळी, लोत, सरंबल या आणि अशा अनेक भाज्या त्यांच्या जंगलात कोठे सापडतात, त्या कशा शिजवायच्या हे माहीत आहे. कुठला पक्षी एका वेळेस किती अंडी देतो, घरटे कसे बांधतो. भारद्वाज फार उंच कसा उडत नाही, डोंगराच्या टिगीला राहतो. हारुड पक्षी कसा उपडा पडून मरतो. नदीतील मासे खेकडे… हे सगळे त्यांना कोणीही पुस्तकातून शिकवलेले नाही. तो त्यांच्या दिवसाचा अविभाज्य भाग असतो. ‘वयम्’तर्फे एक प्रयोग केला गेला. त्यांच्या रोजच्या आयुष्यातील विषय काढले, गप्पागप्पांत छोटे-मोठे अनुभव कागदावर उतरवले. गावात लग्न असते तेव्हा ते काय काय करतात, बाहेरगावी बोचकी बांधून जेव्हा कामासाठी चार पैसे कमावण्यास जातात तेव्हा तेथे पंत्राटदाराबरोबर काय भानगडी होतात, जंगलात शेवळा गवसायला जाताना सापच कसा पाठी लागतो आणि पाहता पाहता पंचवीस शाळांमधील चारशे मुलामुलींनी त्यांचे अनुभव, सण यांविषयी व भाज्या, खेळ त्यांच्या प्रक्रिया याविषयी लिहिले.
मुलांना ते विषय ओळखीचे असले तरी त्यांचे अनुभव मांडणे हे ते नव्यानेच करत होते. त्यातील जागा शोधत होते. त्यांच्या गोष्टींत गावातील लग्नामधील पात्रांविषयी तपशील होते. काही ठिकाणी खेकडे पकडण्याच्या प्रक्रियेविषयी सविस्तर लिहिले होते, पक्ष्यांच्या शिकारीचे अनुभव होते. पोहताना पाण्यात डुंबताना केलेल्या मजा होत्या. त्या नुसत्या घटना नव्हत्या तर ती मुले त्यांच्या लेखनातून कितीतरी मजेचे, भीतीचे, रागाचे क्षण पकडले होते.त्या सगळय़ा गोष्टी ‘पॅलेंडर’च्या माध्यमातून छापल्या गेल्या. त्या गोष्टी वाचलेले अनेक स्तिमित झाले. त्यांना खेडेगावात राहणाऱयांचे दुर्गम अडचणींचे, अभावाचे जग माहीत होते, पण आनंदाच्या जागा मात्र मुलांनीच त्यांच्यापर्यंत थेट पोहोचवल्या होत्या.
कुठला पक्षी घरटे कसे बनवतो? अंडी एका वेळी किती घालतो? उन्हाळय़ात, पावसाळय़ात की हिवाळय़ात दिसतो? रंगाने सारखा असला तरी एका खुणेने वेगळा पक्षी आहे हे ओळखणारी ही त्यांची नजर थक्क करणारी होती. घरटय़ांची वर्णने तर अशी करतात की, पक्षी आणि घरटे जसेच्या तसे डोळय़ांसमोर उभे राहत होते आणि मग कातऱयाला कातऱया का म्हणतात, त्याची नखे कात्रीसारखी कशी असतात, बांडोळा धुराशीच कसा दिसतो, कन्हूर वीस-चोवीस अंडी एकावेळी कसा देतो अशा सगळय़ा तपशिलांवर मुलांबरोबर ‘पक्षीगप्पा’ चांगल्याच रंगतात. त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांना माहीत असलेल्या पक्ष्यांची यादी काढली तर अडुसष्ट पक्षी निघाले! पक्षीगोष्टी लिहिताना त्यात पक्ष्यांच्या शिकारीचेही अनुभव होते. मुलांनी त्यांच्या अनुभवलेखनात पक्षी कसा पकडावा, कसा भुजून खावा याचेही सविस्तर वर्णन केले. पक्षी आपल्या भागात केव्हा केव्हाच दिसतात, नंतर गायब होतात, असे का बरे होत असावे? आपण खातो त्या पक्ष्यांची घरटी आपल्याकडे दिसतात का? अशा प्रश्नांकडे वळवून अभ्यासातून मते तयार होण्याकडे कल व्हावा. त्यांच्या निरीक्षणांना एका मोठय़ा चित्राची जोड देणे, सूक्ष्मरीत्या त्याला अभ्यासणे याकडे वळणे अधिक योग्य ठरेल.
मुलांनी त्यांच्या भागातील पक्ष्यांविषयी लिहिले. त्यांची पक्ष्यांविषयीची निरीक्षणे संशोधनातून मांडलेल्या पक्षीपुस्तकापेक्षा कमी नाहीत. या प्रकल्पादरम्यानची प्रक्रिया, निरीक्षणे हे सगळे मुलामुलींनी त्यांच्या भाषेत, शैलीत लिहिले आहे, तेच ‘पाखरां’ नावाच्या पुस्तकात छापले आहे. त्या पक्षी प्रकल्पादरम्यान पक्ष्यांची केवळ माहिती नाही तर त्यापलीकडे जाऊन तर्कसंगती, अंदाज लावणे, खोलात निरीक्षणे करणे, सहसंबंध ओळखता येणे या आकलन टप्प्यांवरही काम झाले आहे. पुस्तकातील अनोळखी माहिती वाचणाऱया मुलांनी स्वतःच माहितीचा स्रोत ‘पाखरां’ आणि ‘पॅलेंडर’ यांच्या निमित्ताने तयार केला आहे. चार भिंतींच्या शाळेत गप्प गप्प बसणाऱया मुलामुलींनी लिहिलेले पहिलेवहिले पुस्तक ‘पाखरां’ आणि त्यांच्याच जगाविषयी त्यांनीच लिहिलेल्या गोष्टींचे केले. पुस्तक म्हणजे शेवटी निरीक्षणाचा कोलाजच असतो.
(संदर्भ व सौजन्य : जयश्री कुलकर्णी यांचा ‘थिंक महाराष्ट्र’)
– [email protected]





























































