
प्रसिद्ध रेस्टॉरंट चेन ’दिल्ली दरबार’चे संस्थापक जाफरभाई मन्सुरी यांचे गुरूवारी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. मुंबईचे ‘बिर्याणी किंग’ अशी त्यांची ओळख होती. गेल्या आठवडय़ापासून त्यांच्याकर ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
जाफरभाई 1973 पासून हॉटेलिंगच्या व्यवसायामध्ये होते. मुघलाई पदार्थांसाठी प्रसिद्ध असणारे पहिले ‘दिल्ली दरबार’ रेस्टॉरंट त्यांनी ग्रँट रोड येथे सुरू केले. 90 च्या दशकामध्ये मुंबईमध्ये दिल्ली दरबारचा स्वतःचा असा केगळा थाट होता, आताही मुंबईमधील सर्वात लोकप्रिय रेस्टॉरंटपैकी हे एक समजले जाते. देशभरात विविध ठिकाणी तसेच दुबई येथे ‘दिल्ली दरबार’ ची अनेक आउटलेट आहेत.
जाफरभाई यांना पहिल्यापासूनच फूड इंडस्ट्रीत काम करायचे होते. लोकांना खायला घालणे त्यांना फार आवडायचे. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडले आणि आपल्या कुटुंबाचा छोटासा कॅटरिंगचा व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. ते स्वतः मालक असूनही, त्यांनी सर्व छोटय़ा-मोठय़ा गोष्टी अगदी बारकाईने शिकून घेतल्या. त्यांनी अनेक कुक तयार केले. त्यांच्या रेस्टॉरंटमधील मोघलाई पदार्थांसाठी, बिर्याणीसाठी, काही हिंदुस्थानी पदार्थांसाठी त्यांना पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. मांसाहारी पदार्थांसाठी दिल्ली दरबार प्रसिध्द आहे.

























































