लाडक्या बहिणीवरून सत्ताधारी भावांमध्ये वाद; मिंधे म्हणतात, 2100 देता येणार नाहीत, भाजप म्हणते आश्वासन पूर्ण करणारच

लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी भावांमध्ये भांडणे सुरू झाली आहेत. मिंध्यांचे मंत्री म्हणतात, लाडक्या बहिणींना 2100 रुपये देता येणार नाहीत तर भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी मात्र आश्वासन पूर्ण करणारच असे म्हणत त्याला छेद दिला आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी अन्य खात्यांमधील पैसे वळवले जात आहेत. आदिवासी विकास आणि सामाजिक न्याय विभागाचे जवळपास 900 कोटी रुपये नुकतेच लाडकी बहीण योजनेसाठी महिला व बालविकास खात्याला वळते करण्यात आले. त्यावरून टीका होत असतानाच सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देता येणार नाहीत, असा दावा केला आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासन पूर्ण करणारच असे म्हटले आहे. त्यामुळे मिंधे आणि भाजपच्या मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. योजनांमुळे ताण येतो आहे हे खरे आहे, पण उत्पन्न कसे वाढेल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही बावनकुळे म्हणाले. यापूर्वी अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी तर 2100 रुपये देण्याचा शब्द दिलाच नव्हता, असे वक्तव्य केले होते.