भाजप चित्रपट आघाडीचा शहराध्यक्ष रोहन मंकणीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वर्षानुवर्षे वापरत नसलेली विविध खासगी बँकातील निष्क्रिय खात्यांसह (डोरमंट अकाउंट) सक्रिय बँकखात्याची गोपनीय माहिती चोरुन तब्बल 216 कोटी रूपये हडपण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने अटक केली आहे. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या चित्रपट आघाडीचा पुणे शहराध्यक्ष रोहण मंकणीचा आणि संभाजीनगरमधील एका वृत्तवाहिनीच्या दोन संचालकांचा समावेश आहे. दरम्यान, पुणे सायबर पोलिसांनी हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर देशभरातील बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याप्रकरणाचे धागेदोरे शोधण्यासाठी हैद्राबाद, संभाजीनगर गुजरात, मुंबई, लातूर आदि शहरात पोलीस पथके रवाना केली आहेत. संबंधित बँक खाती कार्पोरेट कंपन्यांचीही असल्याचे उघडकीस आले आहे.

रविंद्र महादेव माशाळकर (वय 34, अंबाजोगाई रोड, लातूर), आत्माराम हरिश्चंद्र कदम (वय 34, मुंबई) मूकेश हरिश्चंद्र मोरे (वय 37, येरवडा), राजशेखर यदैहा ममीडा (वय 34, हैदराबाद), रोहन रवींद्र मंकणी (वय 37, सहकारनगर), विशाल धनंजय बेंद्रे (वय 45, वाशीम), सुधीर शांतालाल भटेवरा उर्फ जैन (वय 54, सिंहगड रोड), राजेश मुन्नालाल शर्मा (वय 42, संभाजीनगर), परमजित सिंग संधू (42,संभाजीनगर) आणि अनघा अनील मोडक (वय 40 वडगाव बुद्रुक) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी फिर्याद दिली आहे.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र माशाळकर, मुकेश मोरे, आत्माराम कदम, वरुण वर्मा (मेरठ, उत्तरप्रदेश) यांच्याकडे बँक खात्यांची गोपनीय डेटा स्टोर करण्याची जबाबदारी होती. माशाळकर आणि कदम हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून ते गुजरातमधील वापी व सुरत आणि मुंबईतून पुण्यात बँकेतीली डोरमंट डाटा घेवून आले होते. विकासचंद यादव (रा.सुरत, गुजरात) याने वरूणला भेटून डाटा दिला होता. पुण्यातील मुकेश मोरे आणि संभाजीनगरमधील प्लॉटिंग व्यवसाय करणारा विशाल बेंद्रे ह मध्यस्थी म्हणून काम करत होते. तर भारतीय जनता पक्षाच्या चित्रपट कामगार आघाडीचा पुणे शहराध्यक्ष आणि अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकणी आणि अनघा मोडक मिळून गोपनीय डेटा आणि पैसे ट्रान्सफर करण्याचे काम पाहत होते. राजशेखर ममीडा हैद्राबाद येथून काही बँक खात्याचा डाटा घेवून पुण्यात आला होता. त्याशिवाय सुधीर भटवेरा आणि अनघा मोडक स्टॉक ब्रोकर म्हणून काम करतात. लॉकडाऊननंतर व्यवसायात नुकसान झाल्यामुळे मोडक यामध्ये सहभागी झाल्याचे पोलिसांनी सांगितले

साखळी पद्धतीने केले जात होते काम

रविंद्र माशाळकर, राजशेखर ममीडी व विशाल बेंद्रे यांनी हैद्राबादमधील सोनु व वापीतील दिपकसिंग उर्फ अजय यांचेसोबत गुन्हयाचा कट रचला. वेगवेगळया बँकेच्या सक्रीय व निष्क्रीय खात्यांची गोपनीय माहिती हॅक करुन चोरली. खात्यातील रक्कम परस्पर काढण्याचा कट रोहन मंकणी, आत्मराम कदम, वरुण वर्मा, विकासचंद यादव, सुधीर भटवेरा, राजेश शर्मा, परमजितसिंग संधु, अनघा मोडक यांच्या सहायाने रचला होता.

गुन्हयात बँक अधिकाऱ्यांच्या समावेशाची शक्यता

डॉरमंट खात्याचा जप्त केलेला डेटा पाच बँक खात्यांतील असून संबंधित खात्यात 216 कोटी रूपये शिल्लक होते. गुन्हयात संबंधित बँकेचे किंवा बँकेच्या कामकाजाशी संबंधित व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर व आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या पथकाने केली आहे.