
कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघात भाजप ठरवेल तोच उमेदवार, अशी घोषणा केल्यानंतर भाजपने मिंधे गटाला आणखी एक हादरा दिला आहे. केवळ कल्याण लोकसभा नव्हे तर ठाणे मतदारसंघही भाजपचाच आहे, असा एकमुखी निर्धार आज ठाण्यातील मेळाव्यात भाजप कार्यकर्त्यांनी केला. कल्याण लोकसभेत मिंधे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर बहिष्कार घालण्याची घोषणा भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केल्यानंतर आज भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठाणेही भाजपचेच आहे, तयारीला लागा, असे ऐलान केले तेव्हा तमाम भाजप कार्यकर्त्यांनी टाळय़ांच्या गजरात या घोषणेवर शिक्कामोर्तब केले.
मिंधे गटाला सोबत घेतल्याने त्याचे प्रतिकूल पडसाद निवडणुकीत उमटतील याची जाणीव झाल्याने भाजपने सर्व मतदारसंघांत स्वतःची बांधणी करत मिंधे गटाची काsंडी सुरू केली आहे. त्याची पहिली ठिणगी कल्याण-डोंबिवलीत पडली. मिंधे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे हे सत्तेचा दबाव टाकत भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय करत असल्याचे सांगत भाजप नेते, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या कल्याण-डोंबिवली भाजप कार्यकारिणीने शिंदे यांना कोणतेही सहकार्य न करण्याचा ठराव केला. इतकेच नव्हे तर कल्याण लोकसभेचा पुढील उमेदवार भाजप ठरवेल, असे जाहीर केले. कल्याण-डोंबिवलीतून पहिला धक्का मिळाल्यानंतर आता मिंधे गटाला दुसरा धक्का ठाण्यातूनही मिळाला आहे.
फुकाच्या वल्गना करू नका!
ठाणे भाजपच्या वतीने आज काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवलीचे भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासह नेते व पदाधिकारी उपस्थित होते. या मेळाव्यात भाषणाच्या सुरुवातीलाच रवींद्र चव्हाण यांनी ठाणे हा भाजपचा बालेकिल्ला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ जिंकून आणणे आपल्याला कठीण नाही, हा जिल्हाच भाजपचा आहे असे सांगितले. त्यानंतर ठाण्याचे भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मिंधे गटाचे नाव न घेता त्यांना जोरदार तडाखे लगावले. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेचा उमेदवार कोण हे नेते ठरवतील, आम्ही मोदींना पुढचे पंतप्रधान बनवण्यासाठी एकत्र आलो आहोत, असे वक्तव्य केले होते. त्याचा संदर्भ देत केळकर यांनी श्रीकांत शिंदेंना खडे बोल सुनावले. ते म्हणाले, आता हे साळसूदपणाचा आव आणत मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी आम्ही हे केलं, आम्ही ते केलं असं म्हणताहेत, पण मोदींनी ज्या योजना आणल्या त्या तुम्ही राबवल्यात का, त्या योजना कोणीही राबवल्या नाहीत, त्या योजना आम्ही राबवल्या आहेत. त्यामुळे तुम्ही फुकाच्या वल्गना करणे सोडा, असेही केळकर यांनी खडसावले.
त्यांची कीव करावीशी वाटते
कल्याण लोकसभेचा उमेदवार भाजप ठरवेल असा ठराव कल्याणमध्ये झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मिंधे गटाचे नरेश म्हस्के यांनी कल्याण आणि ठाणे लोकसभा मिंधे गटाकडे आणि भाजपकडे फक्त भिवंडी अशी मल्लिनाथी केली होती त्याचाही केळकर यांनी समाचार घेतला, ते म्हणाले, आमच्यासोबत आलेले आता हे आमचं, ते आमचं असे दावे करू लागले आहेत. मला त्यांची कीव करावीशी वाटते. भाजपशिवाय तुम्ही या जिह्यात निवडून येऊ शकणार नाही हे लक्षात ठेवा. फक्त कल्याणच काय अख्खा ठाणे जिल्हा भाजपचा आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघही भाजपचाच आहे, अशी घोषणाच केळकर यांनी केली.
म्हस्के म्हणतात, केळकर गल्लीतले नेते
कल्याण आमचेच आणि ठाणेही आमचेच, असा निर्धार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्यानंतर मिंधे गटाचे नरेश म्हस्के चांगलेच खवळले आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आमदार संजय केळकर यांच्यावर तोंडसुख घेतले. ते म्हणाले केळकर हे गल्लीतील नेते आहेत. भाजपचे मुख्यमंत्री असताना त्यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात काय काम केले हे एकदा तपासून पाहावेत. तसेच निवडणुकीतील इतिहासदेखील तपासावा.
आमच्यासोबत आलेले आता हे आमचं, ते आमचं असे दावे करू लागले आहेत. मला त्यांची कीव करावीशी वाटते. भाजपशिवाय तुम्ही या जिह्यात निवडून येऊ शकणार नाही हे लक्षात ठेवा. फक्त कल्याणच काय अख्खा ठाणे जिल्हा भाजपचा आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघही भाजपचाच आहे.
संजय केळकर




























































