बेकायदा बांधकामाची तक्रार केल्याने तीळपापड, भाजप नगरसेवकाने रहिवाशाला लाथाबुक्क्यांनी तुडवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेकायदा बांधकामाची तक्रार केल्यामुळे तीळपापड झालेल्या भाजपच्या नगरसेवकाने एका रहिवाशाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार शहरातील अंजूर फाटा परिसरात घडला आहे. या मारहाणीत तक्रार करणारा रहिवासी जबर जखमी झाला आहे. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे मारहाण करणाऱ्या नगरसेवकावर सर्व स्तरांतून टीका केली जात आहे.

विनेश गुढका यांनी बिल्डर किशोर जैन यांच्याकडून महावीर कॉम्प्लेक्समध्ये एक सदनिका 2012 मध्ये खरेदी केली आहे. बिल्डरने स्थानिक पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून या इमारतीमध्ये अनधिकृत बांधकाम केले आहे. या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात गुढका यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर हे अनधिकृत बांधकाम हटवण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेल दिले. या तक्रारीमुळे भाजपचे स्थानिक नगरसेवक नीलेश चौधरी हे दुखावले गेले. त्यांचा तीळपापड झाला. महापालिकेचे पथक कारवाई करण्यासाठी इमारतीत आले असता चौधरी यांनी गुढका यांन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

बिल्डरला नुकसानभरपाई देण्याचे आदेश

गुढका यांनी या इमारतीत 2012 फ्लॅट घेतला असला तरी त्यांना ताबा वेळेत मिळाला नाही. ताबा देण्यासाठी 2015 साल उजाडले. त्यामुळे गुढका बिल्डरच्या विरोधात न्यायालयात गेले असता न्यायालयाने 12 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश बिल्डरला दिले आहेत. मात्र बिल्डर नुकसानभरपाईचे पैसे देण्यास आता टाळाटाळ करत असल्याची माहिती पुढे आली आहे.