राज्यात सरकार स्थापन झाले तरी देवेंद्र फडणवीस बिनखात्याचे मंत्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात नवे सरकार स्थापन होऊन 25 दिवसांचा कालावधी उलटला तरी मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपही लटकले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेच सरकारचा गाडा चालवत आहेत, मंत्रिमंडळाच्या बैठका घेत आहेत. पण उपमुख्यमंत्रीपदाची धुरा वाहणारे देवेंद्र फडणवीस अजूनही बिनखात्याचे मंत्री म्हणून वावरत आहेत.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सतत सांगत असले तरी अजूनही मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकलेला नाही. एकनाथ शिंदे यांच्या गटातील किमान 40 आमदारांना मंत्रीपदाचे वेध लागले आहेत, तर दुसरीकडे भाजपच्या आमदारांनी मंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लॉबिंग सुरू केले आहे. या सर्व रस्सीखेचीत भाजपच्या अनेक इच्छुक आमदारांना मंत्रीपदे देता येणार नाहीत याची खात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पडली आहे. त्याची प्रचीती पनवेलमध्ये पार पडलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिसली. मंत्रिमंडळात सर्वांसाठी सीट नाहीत. त्यामुळे सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होणार नाही, असा स्पष्ट संदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. त्यातच आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी 1 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. या सर्वांमुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडलेला आहे.