
डीएचएफएल घोटाळय़ाचा सूत्रधार कपिल वाधवान याच्याशी आमचा काहीच संबंध नसल्याचा दावा भाजप करीत असला तरी ‘कोब्रा पोस्ट’ या संकेतस्थळाने या स्ट्रींग ऑपरेशन करून भाजपला उताणे पाडले आहे. वाधवान कुटुंबीयांच्या मालकीच्या अनेक कंपन्यांकडून भाजपने देणग्या उकळल्या असून अनेक देणग्यांचा हिशेब ना त्या कंपन्यांना वा भाजपला देताच आलेला नाही. विशेष म्हणजे कंपनीकडून देणगी मिळाली, पण भाजपच्या आर्थिक ताळेबंदात त्याची नोंदच नसल्याची बाबही या ऑपरेशनमध्ये उघड झाली आहे. ‘कोब्रा पोस्ट’च्या ऑपरेशनमुळे भाजपात खळबळ उडाली असून कमळ चिखलातच रूतणार अशी तिखट प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
देशातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा म्हणून डीएचएफएल कंपनीचा 31 हजार कोटींचा घोटाळा गेल्या वर्षी समोर आला होता. यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा केला होता. मात्र त्यांचा हा दावा फोल ठरला असून वाधवान कुटुंबीयांच्या इतर अनेक कंपन्यांनी भारतीय जनता पार्टीला कोटय़वधी रुपयांच्या देणग्या दिल्याचे समोर आले आहे. यात अनेक कंपन्यांना तोटा सहन करावा लागला असताना त्यांनी या देणगी दिल्या. यासंदर्भातील नोंद आर्थिक ताळेबंदात नसल्याची गंभीर बाब आता समोर आली आहे. क्रोबा पोस्टच्या वृत्तानुसार सन 2014-15 मध्ये भारतीय जनता पार्टीला सुमारे 19.5 कोटींची देणगी देण्यात आली आहे. आरकेडब्लू डेव्हलपर्स प्रा. लिमिटेड, स्किल रिअल्टर्स प्रा. लिमिटेड आणि दर्शन डेव्हलपर्स प्रा. लिमिटेड या कंपन्यांकडून ही देणग्या देण्यात आल्या असून या तिन्ही कंपन्यांचे संबंध हे वाधवान कुटुंबीयांशी जुळलेले असल्याचे समोर आले आहे.
या तिन्ही कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणत भारतीय जनता पार्टीला बरीच मदत केल्याचे समोर आले आहे. दर्शन डेव्हलपर्सकडून 2014-15 साली भाजपला 10 कोटी रुपयांची तर 2016-17 रोजी 7.5 कोटींची देणगी दिली असून विशेष म्हणजे आरकेडब्लू डेव्हलपर्स कंपनीकडून 2014-15 च्या आर्थिक ताळेबंद अहवालात भाजपाला देण्यात आलेल्या देणगीचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे स्किल रिअल्टर्सकडून 2014-15 साली 2 कोटी रुपयांची देणगी दिलेली आहे. या देणगीची नोंददेखील आर्थिक ताळेबंद अहवालात नसल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे भाजपाकडून या देणग्या देणाऱया कंपन्यांचे पॅन क्रमांक दिले नसल्याची बाब समोर आली आहे. कंपनी कायदा 2013 च्या कलम 182 नुसार या सर्व देणग्या सध्या संशयाच्या भोवऱयात अडकल्याने भाजपाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कंपन्यांनी केलेली मदत
1. आकेडब्लू डेव्हलपर्स (एकूण देणगी 10 कोटी)
कंपनीकडून सन 2012-13 रोजी आपल्या आर्थिक ताळेबंद अहवालात 24,77,828 रुपयांचा तोटा दर्शविला होता. त्यानंतरही कंपनीने पुढील वर्षी म्हणजेच 2014-15 साली 10 कोटी रुपयांची देणगी भाजपाला दिली आहे. मुंबईच्या या रिअल इस्टेट कंपनीने ही देणगी आपल्या आर्थिक ताळेबंदात नमूद केलेली नाही.
2. स्किल रिअल्टर्स डेव्हलपर्स (एकूण देणगी 2 कोटी)
या कंपनीकडून सन 2014-15 साली 2 कोटी रुपयांची देणगी भाजपाला दिली होती. या कंपनीकडून देखील त्यांच्या आर्थिक ताळेबंद अहवालात या देणगीची माहिती दडवली आहे. त्याचबरोबर कंपनीच्या नोंदवहीमध्ये नफा आणि तोटय़ाची माहिती दिलेली नसल्याची बाबदेखील क्रोबा पोस्टने समोर आणली आहे. तर या कंपनीकडूनदेखील 26,914 रुपयांचा नफा असताना कोटय़ावधी रुपयांची देणगी दिल्याचे उघड झाले आहे.
3. दर्शन डेव्हलपर्स (एकूण देणगी 7.5 कोटी)
दर्शन डेव्हलपर्स या कंपनीकडून भारतीय जनता पार्टीला सन 2016-17 साली 7.5 कोटींची देणगी देण्यात आल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. एकीकडे कंपनीला 2013-14 साली 5,13,406 रुपयांचा तर 2014-15 साली 4,650 रुपयांचा तोटा झाला होता. तर 2015-16 साली कंपनीला 2,82,691 रुपयांचा नफा झालेला आहे. त्यानुसार कंपनी कायद्याच्या नियमानुसार देणगी देवू शकते, परंतु यावेळी कंपनीने नियमानुसार 7.5 टक्क्यांपेक्षा अधिक देणगी दिल्याचे आर्थिक ताळेबंद अहवालानुसार कळते.
























































