
बंडखोर उमेदवारांमुळे भाजपसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून, चंद्रपुरात शहराध्यक्षांच्या निलंबनाचे पत्रच प्रचाराचे हत्यार बनवण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी अंतिम केलेल्या यादीतून ज्या 17 उमेदवारांची नावे वगळण्यात आली होती, त्या उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत पक्षासमोर अडथळे उभे केले आहेत.
प्रदेशाध्यक्षांच्या यादीत फेरफार केल्याच्या आरोपावरून शहराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांना पदावरून तत्काळ हटवण्यात आले असले, तरी पक्षातील असंतोष अद्याप शमलेला नाही. अधिकृत यादीतून नाव कापण्यात आलेल्या उमेदवारांनी कासनगोट्टूवार यांच्या प्रभागातच थेट प्रचाराला सुरुवात केली असून, त्यांच्या निलंबनाचे पत्र मतदारांमध्ये वाटले जात आहे.
सुभाष कासनगोट्टूवार यांनी आपण पदावरून हटवले गेले नसून स्वतःहून राजीनामा दिल्याचा दावा केला आहे. मात्र हा दावा चुकीचा असून पक्षाने त्यांची हकालपट्टी केल्याचे मतदारांना कळावे, यासाठीच आम्ही निलंबनाचे पत्र वाटत आहोत, असे बंडखोर उमेदवारांचे म्हणणे आहे. कासनगोट्टूवार हे त्या प्रभागातून भाजपचे अधिकृत उमेदवार असले तरी बंडखोरांनी त्यांच्या विरोधात उघड मोहीम छेडल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एखाद्या पदाधिकाऱ्याच्या निलंबनाचे पत्र प्रचार साहित्याच्या स्वरूपात मतदारांना वाटण्याची ही घटना या निवडणुकीत प्रथमच घडत असल्याचे चित्र आहे.


























































