
कोरोना महामारीच्या संकटातही मनमानीपणे फी वसूल करणाऱया शाळांविरोधात तक्रार घेऊन गेलेल्या मध्य प्रदेशातील पालकांना भाजपा मंत्र्याच्या धक्कादायक वक्तव्याचा सामना करावा लागला आहे. मध्य प्रदेशचे शालेय शिक्षण मंत्री असलेल्या इंदरसिंग परमार यांनी पालकांची तक्रार तर ऐकून घेतलीच नाही, उलट फी वाढीबाबत शिक्षण विभाग ऐकत नसेल तर ‘जाऊन मरा, तुम्हाला जे करायचे ते करा’ असे बेजबाबदार वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.
शाळांनी कोरोना संकटकाळात विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त फी वसूल करू नये, असे निर्देश मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र शाळा त्याचे पालन करत नसल्याने मध्य प्रदेश पालक महासंघाने शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे, पण शिक्षण विभाग त्याची दखल घेत नसल्याने आज 100 हून अधिक पालकांनी एकत्रित येत शिक्षण मंत्री इंदरसिंग परमार यांची भेट घेत फी वाढीविरोधात हस्तक्षेप करून पालकांना दिलासा देण्याची मागणी केली. पण मंत्री महोदयांनी पालकांचे म्हणणे ऐकून न घेता ‘जाऊन कुठं तरी मरा, तुम्हाला जे करायचे ते करा’ असा अजब सल्ला दिला आहे.


























































