
चार राज्यांधील 5 विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार दणका देत गुजरातमध्ये आपने एक जागा खेचून आणली. गुजरातमधील विसावदर व पंजाबच्या लुधियाना पश्चिम येथे आपने बाजी मारली, तर केरळमध्ये काँग्रेस आणि पश्चिम बंगालमधील कालीगंज मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला.
गुजरातच्या कडी येथून भाजपचे उमेदवार राजेंद्र चावडा विजयी झाले. त्यांनी काँग्रेसच्या रमेश चावडा यांचा पराभव केला तर विसावदर येथून आपचे गोपाल इटालिया यांनी बाजी मारली. येथे भाजपचे कीर्ती पटेल दुसऱया क्रमांकावर राहिले. केरळमध्ये काँग्रेसचे आर्यदन शौकत विजयी झाले. त्यांनी सीपीआयएमच्या के.एम. स्वराज यांचा पराभव केला. तर पंजाबच्या लुधियाना पश्चिम येथून आपचे उमेदवार संजीव अरोरा यांनी बाजी मारली. काँग्रेसचे भारत भूषण हे दुसऱया क्रमांकावर राहिले. पश्चिम बंगालच्या कालीगंज येथून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार अलिफा अहमद जिंकले. त्यांनी भाजपच्या आशीष घोष यांचा पराभव केला. या सर्व जागांवर 19 जून रोजी मतदान झाले होते. दरम्यान, कालीगंज येथे मतमोजणी सुरू असताना कृष्णा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाराचंदगर परिसरात स्पह्ट झाला. यात 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी दुःख व्यक्त केले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे म्हटले आहे.
केजरीवाल राज्यसभेवर जाणार नाहीत
लुधियाना येथून संजीव अरोरा विजयी झाल्यामुळे ते राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्या जागी आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल राज्यसभेवर जातील असे बोलले जात होते. परंतु अरोरा यांनी पोटनिवडणूक जिंकल्यानंतर केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यसभेवर जाणार नसल्याचे स्पष्ट केले.