मोदींचे आदेश गोव्याच्या भाजप आमदाराने समुद्रात बुडवले

1292

केंद्रातील मोदी सरकारने ‘एलईडी’ मासेमारीवर कठोर निर्बंध घालून कायदा केला असताना गोव्यातील भाजपच्याच आमदाराने मोदींचे आदेश समुद्रात बुडवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. गोव्याचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांचा ट्रॉलर ‘एलईडी’ मासेमारी करताना महाराष्ट्राच्या मासेमारी खात्याने मालवणमध्ये रंगेहाथ पकडला असून हजारो रुपयांचे मासे आणि सामग्री जप्त केली आहे.

समुद्री जैवविविधतेला असणारा धोका आणि माशांच्या पैदासीला ‘एलईडी’ मासेमारी घातक ठरत असल्यामुळे या मासेमारीवर बंदी घालण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला आहे. मात्र मोदी सरकारचा आदेश गोव्यातील भाजप आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांनी केराच्या टोपलीत टाकला आहे. सिल्वेरा यांचा ट्रॉलर मालवणमध्ये बेकायदेशीरपणे मासेमारी करताना सापडला आहे. या कायवाईत ट्रॉलरसह ‘एलईडी’ बल्ब, सब मर्सिबल बल्ब, जनरेटर, केबलसह मोठय़ा प्रमाणात मासेही जप्त केले आहेत. दरम्यान, सिल्वेरा यांच्या मनमानीचा गोवा फॉर्वर्डचे दुर्गादास कामत यांनीही तीक्र शब्दांत निषेध केला आहे. गोव्याचे मायकल लोबो यांच्यासारखे मंत्री ‘एलईडी’ मासेमारीला आपला विरोध असल्याचे दाखवतात. मात्र त्यांची कृती प्रत्यक्षात उलट असल्याचा आरोप कामत यांनी केला आहे. मच्छीमार, रापणकरांसाठी भाजपचे प्रेम बेगडी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

…तर पाच पट दंड
महाराष्ट्राच्या मासेमारी खात्याने सिल्वेरा यांच्या ट्रॉलरमधून जप्त केलेल्या माशांचा लिलाव 61 हजार 700 रुपयांना करण्यात आला आहे. ही मासेमारी बेकायदेशीर असल्यामुळे सिल्वेरा यांना नियमानुसार पाच पट म्हणजेच 3 लाख 8 हजारांचा दंड होऊ शकतो. या कारवाईचा संपूर्ण अहवाल मालवणचे तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

आम्हाला मासे मिळणार कुठून!
‘एलईडी’ मासेमारीमुळे मोठय़ा प्रमाणात मासे मिळतात. मात्र या बेकायदेशीर आणि बाहेरील माणसांकडून केल्या जाणाऱया मासेमारीमुळे स्थानिकांना मासे मिळणे मुश्कील झाले आहे. अशी बेकायदेशीर मासेमारी सुरू राहिल्यास आम्हाला मासे मिळणार कुठून असा सवाल स्थानिक मच्छीमार करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या