सुजयच्या रुपाने नगरमध्ये पार्टीला ‘सर्जन’ भेटलाय; त्याचा फायदाच होणार- प्रा. बेरड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

डॉ. सुजय विखे पाटील यांना भाजपमध्ये घेऊन श्रेष्ठीनी जो संदेश द्यायचा तो दिला आहे. त्यांच्या प्रवेशाने मी काही नाराज झालोलो नाही, येत्या एक दोन दिवसात पक्षातील सर्वच नेते समन्वय समितीची बैठक झाल्यानंतर कामाला लागतील, असा विश्‍वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी देऊन नगर दक्षिणसह शिर्डीची जागा शिवसेना-भाजप युतीच जिंकणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने नगरमधून डॉ. सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर उमेदवार डॉ. विखे पाटील यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष या नात्याने प्रा. बेरड व अॅड. अभय आगरकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी ज्येष्ठ नेते सदा देवगावकर, अॅड. युवराज पोटे, नगरसेवक भैय्या गंधे, बाबासाहेब सानप आदी उपस्थित होते. सचिन पारखी यांच्या स्वागतानंतर जिल्हाध्यक्ष प्रा. बेरड यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

‘एक बार फिर, मोदी सरकार’ येणार यात शंकाच नाही. मात्र, नगरचा विचार केला तर सुजय विखे यांच्या रुपाने नगरमध्ये भाजपाला उत्तम ‘सर्जन’ भेटला असून त्याचा फायदा निश्‍चितपणे होणार असल्याचे नमूद करतानाच नगरसह शिर्डीची जागा आम्ही जिंकू असा आत्मविश्‍वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

भाजपाने नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकनिष्ठपणे काम केले पाहिजे. देशात पुन्हा एकदा एक बार फिर मोदी सरकार आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी केले. यावेळी प्रा. बेरड म्हणाले, राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे राज्यासह देशात एक वेगळा संदेश गेला आहे. भाजपाने उमेदवार जाहीर केला असून तो निर्णय पक्ष हिताचाच आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्यामुळे पक्षाचेच काम करणार आहे. निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी रविवारी युतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. तसेच आ. शिवाजी कर्डिले, आ. मोनिका राजळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांची एक निवडणूक समिती तयार केली जाणार आहे.

काँग्रेसला माणसे सांभाळता येत नाहीत
राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने देशात एक वेगळा संदेश गेला आहे. विखे घराणे हे देशात प्रतिष्ठीत आहे. मोठ मोठी पदे भोगली आहेत. काँग्रेसला आपली माणसे सांभाळता येत नसल्याची जहरी टीकाही जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी काँग्रेसवर केली. काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा यांचा भाजपात प्रवेश झाला असून अजूनही खूप लोक भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे ते म्हणाले.

युती झालीय, त्यामुळे महापालिकेत अडचण नाही- प्रा. बेरड
महापालिकेत सत्ता स्थापनेच्यावेळी भाजपाने कोणत्याही पक्षाला पाठिंबा मागितला नव्हता. त्यांनी स्वतःहून पाठिंबा दिलेला आहे. राज्यात व देशात शिवसेना-भाजपाची युती झालीय. त्यामुळे आता पाठिंबा देणार्यांनी पाठिंबा काढला तरी अडचण नसल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीने पाठिंबा काढला तरी काहीही फरक पडणार नसल्याचे ते म्हणाले.

भाजपात एकवाक्यता लवकरच दिसेल
दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी भाजपाने डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी रविवारी बैठक होत आहे. त्यानुसार लवकरच तालुकास्तरावर, जिल्हा स्तरावर मेळावे सुरु होवून शिवसेना-भाजपातील पदाधिकार्यांमध्ये एकवाक्यता दिसे असले प्रा. बेरड यांनी सांगितले.

खा. गांधी – डॉ. विखेंची लवकरच भेट होईल
भाजपाकडून पहिल्याच उमेदवारांच्या यादीत डॉ. सुजय विखे पाटील यांचे नाव फायनल झाले आहे. त्यामुळे खा. दिलीप गांधी समर्थकांकडून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. दरम्यान, डॉ. विखे यांनी दक्षिणेतील युतीच्या नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्या आहेत. परंतु, अद्यापही डॉ. विखे व खा. गांधी यांची भेट झाली नसल्याबाबत पत्रकारांनी प्रश्‍न उपस्थित केला असता जिल्हाध्यक्ष बेरड म्हणाले, खा. गांधी व डॉ. विखे यांची लवकरच भेट होईल असे सांगितले.

माझी गाडी कधीच नगरमध्ये आलीय- डॉ. सुजय विखे
राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात डॉ.सुजय विखे यांचे नाव न घेता मी जर प्रत्येक घडामोडीकडे बारकाईने लक्ष दिले असते तर त्यांची गाडी राहुरीच्या पुढे आलीच नसती. गाडी परत लावण्याचे काम संग्राम करेल, असे विधान केले होते. याबाबत पत्रकार परिषदेत डॉ. सुजय विखे यांना विचारले असता. माझी गाडी राहुरीच्या पुढे आलीय आणि ती नगरमध्ये आली असल्याची मार्मिक टिपण्णी डॉ. विखे यांनी केली. तसेच माझ्यावर काय आरोप करायचेत ते करु द्या, सर्वांचे उत्तर एकदाच मिळेल असे त्यांनी निक्षुन सांगितले.

जिल्हा भाजपाची रविवारी महत्वपूर्ण बैठक
निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना व भाजपाच्या पदाधिकारी – कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राहण्याच्या अनुषंगाने भाजपाचे प्रसाद ढोकरीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पालकमंत्री राम शिंदे, आ. शिवाजीराव कर्डिले, आ. मोनिकाताई राजळे, बबनराव पाचपुते व मान्यवरांच्या उपस्थितीत संजोग लॉन येथे महत्वपूर्ण बैठक रविवारी होणार आहे. या बैठकीत निवडणूक समिती व तत्सम समित्या निवडल्या जाणार असल्याचेही प्रा. बेरड यांनी सांगितले.