भाजप सरकारला फक्त प्रसिद्धीची हाव – राहुल चव्हाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार योजनांच्या घोषणा करून त्या जनतेच्या माथी मारत आहे. मात्र, त्यांतील एकही घोषणा सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचलेली नाही. जाहीर केलेले एकही आश्वासन यांनी पाळलेले नाही. भाजपला फक्त प्रसिद्धीची हाव आहे,’ असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक राहुल चव्हाण यांनी केला.

माढा लोकसभा मतदारसंघात 4 ते 15 ऑक्टोबर या काळात प्रत्येक गावात ‘होऊ द्या चर्चा’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या फसव्या घोषणांचा पर्दाफाश केला जाणार आहे. मतदारसंघातील 364 गावांमध्ये कॉर्नर सभा घेणार आहोत. प्रत्येक महाविद्यालयात, आरोग्य केंद्रात, बाजाराच्या ठिकाणी जाऊन आम्ही लोकांना जागृत करणार आहोत. याबाबत अकलूज येथील पत्रकार परिषदेत निरीक्षक राहुल चव्हाण यांनी माहिती दिली. यावेळी धनंजय डिकोळे, गणेश इंगळे, संतोष राऊत, स्वप्नील वाघमारे, राजाभाऊ गायकवाड यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

राहुल चव्हाण म्हणाले, ‘‘रात्रीस खेळ चाले’ याप्रमाणे भाजपचे सरकार आहे. 15 लाख रुपये जनतेच्या खात्यावर टाकणार होते, त्याचे काय झाले? ‘उज्ज्वला’ गॅस योजनेचे काय झाले? शिवछत्रपतींच्या स्मारकाचे काय झाले? मणिपूर अजूनही धुमसतेय, महागाई पराकोटीला पोहोचलीय, बेरोजगारी वाढलीय. आता तर हे सरकारी शाळा खासगी संस्थांच्या ताब्यात द्यायला निघालेत. यांच्या काळात उद्योगपतींच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ होतेय आणि दुसऱया बाजूला रेशनला आधार जोड, पॅनला आधार जोड, आधारला मोबाईल जोड या खेळामध्ये जनता नागविली जात आहे,’ असा टोला त्यांनी हाणला.