
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून कौल दिला आहे. त्यामुळे राज्याचे नेतृत्व आम्हीच करणार, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सरकार स्थापनेच्या हालचाली दिवाळीनंतर सुरू होतील असेही ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत भाजपला 105, तर शिवसेनेला 56 जागा मिळाल्या आहेत. राज्यात शिवसेना-भाजप आणि मित्र पक्षांच्या महायुतीचेच सरकार येणार असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील जनतेने महायुतीच्या पारडय़ात सरकारसाठी मतदान टाकले आहे. जनतेच्या या मतदानाचा प्रत्येकानेच आदर करायला हवा आणि त्याबद्दल कुणीही शंका उपस्थित करू नये.
जागांच्या गणितानुसार भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे दिवाळीनंतर आमच्या आमदारांची बैठक होईल. त्यात नेता निवड होईल आणि त्यानंतर लवकरच नव्या सरकारचा शपथविधी होईल असे सांगून मुख्यमंत्र्यांनी महायुती राज्याला मजबूत आणि स्थिर सरकार देईल असा विश्वासही व्यक्त केला.
























































