
राज्याच्या सत्तेत गळ्यात गळे घातलेल्या मिंधे गटावर भाजपने मीरा-भाईंदरमध्ये सर्जिकल कंटेनर अटॅक केला आहे. भाजपच्या खेळीमुळे महापालिका प्रशासनाने मिंधे गटाच्या कंटेनर कार्यालयांची थेट हायड्रो क्रेन मागवून ‘उचलबांगडी’ केली. शहरात सुमारे 22 ठिकाणी मिंधे गटाने फुटपाथ आणि रस्ते अडवून बेकायदा कंटेनर कार्यालये सुरू केली होती. या कंटेनर कार्यालयांना शह देण्यासाठी भाजपने पालिका आयुक्तांचे निवासस्थान आणि पोलीस आयुक्तालयासमोर कंटेनर कार्यालय थाटले आणि नोटीस मिळाल्यानंतर उचलून नेले. आपले कंटेनर वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी थेट एकनाथ शिंदेंकडे आदळआपट केली. मात्र त्यानंतरही कमळाबाईने मिंधेंचा करेक्ट कार्यक्रम केला.
मीरा-भाईंदर शहरात गेल्या काही महिन्यांपासून विविध पक्षांचे अनधिकृत कंटेनर कार्यालयाने फुटपाथ आणि रस्ते अडवून ठेवले होते. त्यामुळे शहरात कंटेनर वॉर सुरू झाल्याचे निर्माण झाले होते. या अनधिकृत कंटेनर कार्यालयावर नागरिकांकडून कारवाई करण्याची मागणी केली जात होती. त्यानंतरदेखील महापालिकेकडून कारवाई होत नसल्याने भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांच्या बंगल्याशेजारी भाजपचे कंटेनर जनसंपर्क कार्यालय टाकले. पोलीस आयुक्तालयासमोरही भाजपने एक कंटेनर ठेवला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
कारवाई नियमानुसार
महापालिकेने मिंधे गटासह भाजपला कंटेनर शाखा व कार्यालये बंद करून उचलून घेऊन जाण्यासाठी नोटिसा पाठवल्या. त्यानुसार भाजपने स्वतःहून त्यांचे बेकायदा कंटेनर कार्यालय हटविले आहे. मिंधे गटाने मात्र आपले बेकायदा कार्यालय वाचवण्यासाठी जिवाचा आटापिटा केला. मात्र पालिका प्रशासनाने हायड्रा क्रेन लावून कारवाई करण्यास सुरुवात केली. ही कारवाई नियमानुसार असल्याचे पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी सांगितले आहे.


























































