बीडीओला घरात घुसून मारहाण, भाजप तालुकाध्यक्षावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

‘पाणी पुरवठा समितीच्या बैठकीला आम्हाला का बोलवले नाही’ असा जाब विचारत भाजपाचे राजेश देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह घरात घुसून आपल्याला मारहाण केली. तसेच दारापर्यंत ओढत नेऊन धमकावल्याचेही गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. गटविकास अधिकाऱ्याला घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी भाजप तालुकाध्यक्षासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात 23 जानेवारीला रात्री 11.30 च्या दरम्यान टाकळी कु. येथील भाजपाचे राजेश देशमुख आणि सात-आठ जणांनी मिळून पं.स.चे गटविकास अधिकारी चंद्रहार एम. ढोकणे यांच्या घरी जावून हल्ला केला. यावेळी ढोकणे यांना जबर मारहाण करण्यात आली. या घटनेचा तीव्र निषेध करत कामबंद आंदोलन केले आहे. यावेळी अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन मारहाण होत असेल तर कर्मचाऱ्यांचे काय होणार? असा संतप्त सवाल उपस्थित करत असुरक्षीततेची भावना कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात नुकतीच दोन दिवसांपूर्वी पाणी टंचाईची आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांच्यावर भाजपाचे तालुकाध्यक्ष संतापले होते. त्याचाच राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी घरात घुसून बेदम मारहाणीचा प्रकार केला आहे.