कुस्तीपटूंच्या आंदोलनाला भाजप नेत्याचा पाठिंबा

भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना एका भाजप नेत्याने पाठिंबा दिला आहे. अनेक दिवसांपासून जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या या खेळाडूंना अनेक पक्षांचे नेते भेटून गेले. मात्र, भाजपकडून कुणीही आलं नव्हतं. आता हरयाणाचे भाजप खासदार ब्रिजेंद्र सिंह यांनी मात्र खेळाडूंचं समर्थन केलं आहे.

ब्रिजेंद्र सिंह हे हरयाणातील भाजपचे असे एकच खासदार ठरले आहेत, जे या कुस्तीपटूंच्या बाजूने बोलत आहेत. 28 मे रोजी नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी दिल्ली पोलिसांनी अक्षरशः फरफटत या खेळाडूंना ताब्यात घेतलं होतं. या प्रचंड मनस्ताप आणि अपमानानंतर खेळाडूंनी आपली पदकं गंगेत वाहण्याचा निर्णय घेतला होता. सुदैवाने काही शेतकरी नेत्यांनी मध्यस्थी केली आणि खेळाडूंनी तो निर्णय काही काळासाठी रहित केला. त्याच दरम्यान, ब्रिजेंद्र सिंह यांनी ट्वीट करून कुस्तीपटूंना पाठिंबा जाहीर केला होता.

या कुस्तीपटूंनी आयुष्यभराची मेहनत करून पदकं मिळवली, मात्र आता ते ती या नदीत विसर्जित करत असल्याने त्याच्या वेदना आणि असहाय्यता मला जाणवते आहे. त्यांनी ही पदकं ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ, आशियाई खेळात विजय संपादन करून मिळवली आहेत. हे सर्व हृदयद्रावक आहे, असं ट्वीट त्यांनी केलं होतं. त्यापूर्वीही सिंह यांचे वडील चौधरी बिरेंद्र सिंह यांनी या खेळाडूंची भेट घेत, त्यांनी केलेले आरोप गंभीर असल्याची प्रतिक्रिया दिली होती.