एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू असतानाच खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत खडसेंच्या प्रवेशाविषयी चर्चा झाल्याचे वृत्त समोर आल्याने या चर्चेला बळच मिळाले. मात्र प्रत्यक्षात राष्ट्रवादीकडून अशी कोणतीच चर्चा झाली नसल्याचे म्हटले जात आहे तर एकनाथ खडसे यांनी चर्चा ज्यांनी सुरू केली त्यांनाचा विचारा असे सांगून यावर बोलणे टाळले.

राष्ट्रवादी कार्यालयात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत उत्तर महाराष्ट्रातील मोठया नेत्याला पक्षात घेण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आता तो नेता कोण यांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. उत्तर महाराष्ट्रात एकनाथ खडसे भाजपचे मोठे नेते असल्याने ते भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना जलसंपदामंत्री प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या वृत्ताचे खंडन केले. ‘एकनाथ खडसे यांच्याबाबत कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नाही. बैठकीत जळगाव जलिंसचन प्रकल्पाबाबत चर्चा झाली. एकनाथ खडसेंच्या नाराजीबाबत त्यांच्या पक्षाने विचार करावा. त्यामुळे राजकारणात जर-तरला महत्त्व नसते, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. तर खुद्द खडसे यांनी ‘हा विषय आपल्याला माहिती नाही. ज्यांनी या विषयावर चर्चा सुरू केली त्यांनाच तुम्ही विचारा,’ असे सांगून चर्चेला पूर्णविराम दिला.

नाथाभाऊ भाजपचं नुकसान नाही करणार

कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘एकनाथ खडसे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षांना आजवर त्यांना भरभरुन दिलं आहे. त्यामुळे पक्षाचं नुकसान होईल अशी कोणती भूमिका ते घेणार नाहीत. याआधीही त्यांच्याबद्दल अशा चर्चा झाल्या असून त्या अफवा ठरल्या आहेत. हीदेखील अफवाच ठरेल’.

आपली प्रतिक्रिया द्या