
उत्तर प्रदेशच्या लॉ कॉलेजमधील विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली माजी केंद्रीय मंत्री व भाजपा नेता स्वामी चिन्मयानंद याला विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) येथील दिव्य धाम आश्रमातून शुक्रवारी अटक केली. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ‘माझ्या कृत्याची मला लाज वाटतेय’ अशा शब्दांत चिन्मयानंद याने आपल्या कु-कृत्याची कबुली दिली.
BJP leader Swami Chinmayanand was sent to 14 days judicial custody for allegedly raping a law student in Uttar Pradesh’s Shahjahanpur district.
Read @ANI Story |https://t.co/wKFDzKGb5v pic.twitter.com/07Js9VMfHs
— ANI Digital (@ani_digital) September 20, 2019
एसआयटीने पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. या विद्यार्थिनीकडून मसाज करून घेताना चिन्मयानंद हा अश्लील बोलत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ खरा असल्याचे चिन्मयानंद याने चौकशीत कबूल केले. त्याचप्रमाणे विद्यार्थिनीकडून मसाज केल्याचा आणि त्यावेळी अश्लील बोलल्याचेही त्याने मान्य केले असे एसआयटी प्रमुख नवीन अरोरा यांनी सांगितले.
जानेवारीपासून आतापर्यंत चिन्मयानंद आणि संबंधित विद्यार्थिनी यांच्यात सुमारे 200 वेळा फोनवर बोलणे झाले होते अशी माहिती त्यांनी दिली. चिन्मयानंद आणि त्या विद्यार्थिनीमध्ये सुरू असलेल्या ब्लॅकमेलिंगमध्ये मुख्य सूत्रधार असलेल्या तीन तरुणांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी चिन्मयानंद याच्याकडून पाच कोटी रुपये उकळले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून एसआयटीकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. या विद्यार्थिनीने पोलिसांना एक मोबाईल फोन आणि पेन ड्राइव्ह दिला होता. त्यात चिन्मयानंद याच्या 43 व्हिडिओ क्लिप्स असल्याची माहिती विद्यार्थिनीने दिली होती. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी चिन्मयानंद याच्याविरुद्ध अपहरण आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल केला आहे. चिन्मयानंद याने वर्षभर आपले लैंगिक शोषण केल्याचाही दावा तिने केला आहे. तिच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांचीही याप्रकरणी चौकशी केली जात आहे.




























































