फोन टॅपिंगवरून राजकारण तापले

1194

राज्यात भाजपची सत्ता असताना इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करून भाजपने लोकसभा व विधानसभा निवडणुकीदरम्यान विरोधकांचे फोन टॅप केल्याची माहिती पुढे आली आहे. फोन टॅप करून विरोधकांवर पाळत ठेवल्याच्या मुद्दय़ावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सर्वांनीच भाजपच्या स्वार्थी राजकारणाचा खरपूस समाचार घेतला आहे.

भाजप सरकारकडून विरोधकांचे फोन टॅप होत असल्याची तक्रार काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी सर्वप्रथम केली होती. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अन्य प्रमुख नेत्यांचे फोन टॅप करून विरोधकांवर पाळत ठेवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत, तर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नसल्याचे सांगत भाजप सरकारवरील आरोप फेटाळून लावले आहेत.

मी कोणत्याही गोष्टी लपून करत नाही – संजय राऊत
फोन टॅपिंगची आपल्याला कल्पना होती. तुमचा फोन टॅप होत आहे ही माहिती मला भाजपच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने दिली होती. जर माझे बोलणे कोणाला ऐकायचे असेल तर त्यांचे स्वागतच आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य आहे. मी कोणत्याही गोष्टी लपून करत नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. फोन टॅपिंग प्रकरणात ट्विट करून त्यांनी आपली भूमिका मांडली.

पेगासेस विकत घेण्याचा अधिकार सरकारला होता का – जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पोगासेस आणि फोन टॅपिंगबद्दल भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे. फोन टॅपिंग ही एक विकृती असल्याचे म्हटले आहे. पेगासेस विकत घेण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला होता का, असा प्रश्न उपस्थित करत आव्हाड यांनी या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा – अशोक चव्हाण
निरंकुश व अखंड सत्ता हाच भाजपचा एकमेक अजेंडा राहिलेला आहे. सत्ता टिकवण्यासाठी भारतीय जनता पक्ष नैतिकता, नियम, संकेत, परंपरा सारे धाब्यावर बसवून काहीही करू शकते हे महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे फोन टॅपिंगच्या आरोपात तथ्य असण्याची दाट शक्यता असून मुख्यमंत्र्यांनी याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

याप्रकरणी चौकशी करून अहवाल जनतेपुढे ठेवा – फडणवीस
या प्रकरणात ज्यांनी तक्रार केली आहे त्यांची राजकीय विश्वसनीयता ही संपूर्ण देशाला ठाऊक आहे. त्यामुळे राज्य सरकारला ज्या यंत्रणेमार्फत चौकशी करायची असेल ती करायला ते मोकळे आहेत. सत्य महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊक आहे. याप्रकरणी तत्काळ चौकशी करून त्याचा अहवाल राज्याच्या जनतेपुढे ठेवावा असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या