पैसे घेऊन तिकिटे विकली! लातुरात भाजपच्या निष्ठावंतांचा माघार घेण्यास नकार

पक्षाने महापालिका निवडणुकीची जबाबदारी विश्वासाने ज्यांच्या खांद्यावर टाकली त्यांनीच पैसे घेऊन तिकिटे विकल्याचा आरोप करत भाजप निष्ठावंतांनी उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला. पक्षाने दिलेल्या उपऱया उमेदवारांना पाडणारच, असा निर्धारही या निष्ठावंतांनी व्यक्त केल्याने लातुरात भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

लातूर महानगरपालिकेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्येच लढत होईल असे चित्र होते; परंतु कालपासून हे चित्र बदलले आहे. भाजपचे निवडणूक प्रभारी संभाजी पाटील-निलंगेकर यांनी तिकीट वाटपात मनमानी करून बाहेरून आलेल्यांना तिकिटे विकल्याचा आरोप करत भाजपमधील निष्ठावंतांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कल्पतरू मंगल कार्यालयात बैठकही घेण्यात आली. जवळपास 65 उमेदवारांनी एकत्र येत पक्षाविरोधात दंड थोपटले होते. आज उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी यापैकी फक्त पाच ते सहा जणांनीच अर्ज मागे घेतल्याची माहिती आहे. उर्वरित सर्वांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. निष्ठावंतांनी अर्ज कायम ठेवल्याने भाजपसमोर नवेच आव्हान उभे राहिले आहे.