विरोधकांच्या मंचावरून शत्रुघ्न सिन्हांचे मोदी सरकारवर जहरी टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, कोलकाता

“जोपर्यंत तुम्ही खरी उत्तरं दडवून ठेवण्याचा प्रयत्न कराल तोपर्यंत तुम्हाला जनतेकडून ‘चौकीदार चोर है’ ऐकावेच लागेल” असं म्हणत भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. एका बाजूला नोटाबंदी आणि दुसऱ्या बाजूला जीएसटी हे म्हणजे कडुलिंबावर कारलं अशी परिस्थिती झाली असल्याचं सिन्हा म्हणाले.

सिन्हा यांनी यावेळी मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्या विरोधकांचे तोंडभरून कौतुक केले त्याच वेळी ते ज्या पक्षाचे खासदार आहेत त्या पक्षाच्या नेत्यांना आणि खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना टीकेचे लक्ष्य केले. व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे.

भाजपमध्ये असूनही विरोधकांसोमत या सभेत सहभागी झाल्याने आणि मंचावरून भाषण ठोकल्याने अनेकांच्या भुवया उचावल्या आहेत. सिन्हा यांना त्याची कल्पना असल्याने त्यांनी भाषणामध्ये ते इथे का आले त्याचा खुलासा केला. मी भाजपमध्ये असलो तरी मी जनतेच्या बाजूने आहे आणि मी माझ्या पक्षाला आरसा दाखवण्याचे काम करतो असं त्यांनी भाषणात म्हटले आहे.

शत्रुघ्न सिन्हा विरोधकांच्या मंचावर, भाजप कारवाई करण्याची शक्यता

गेल्या काही महिन्यांपासून मोदी सरकारविरोधात बोलणारे भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा हे कोलकातामध्ये विरोधकांच्या सभेला उपस्थित राहिल्याने भाजप त्यांच्यावर प्रचंड वैतागली आहे. शत्रुघ्न सिन्हा हे संधीसाधू असल्याची टीका भाजप नेते राजीव प्रताप रूडी यांनी केली आहे. काही लोकांच्या इच्छा मोठ्या असतात असं म्हणत रुडी यांनी सिन्हा यांच्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असं म्हटलं आहे.

सिन्हा यांच्यावर टीका करताना रूडी म्हणाले की

“काही माणसे इतकी चलाख असतात की ती भाजपची खासदारकी मिळवून त्यातून लाभ मिळवण्याचे काम करतात, आपल्यावर पक्षप्रतोदांकडून कारवाई होऊ नये याची ते खबरदारी घेत असतात त्याचवेळी ते इतके संधीसाधू असतात की ते अशा (विरोधकांच्या) सभामंचकांवर जात असतात. भाजप याची नक्कीच दखल घेईल”