
भाजपचे मुंबई अध्यक्ष, आमदार अमित साटम यांनी पंतप्रधान मोदी यांच्या परदेश दौरे टाळा या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या मुलीचा परदेश दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. साटम यांची मुलगी माहिका साटम हिने नुकताच कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला असून तिला दक्षिण कोरियातील सोल येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली होती, परंतु, साटम यांच्या कुटुंबीयांनी माहिकाला दक्षिण कोरियाला न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
अमित साटम यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली असून त्यात ते म्हणतात की, देशाचे पंतप्रधान मोदी यांनी देशहितासाठी काही काळ आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाचा आदर करत कुटुंबाने एकमताने निर्णय घेतला आहे की, माहिका या स्पर्धेसाठी दक्षिण कोरियाला जाणार नाही. स्पर्धा पुन्हा येतील आणि भविष्यात माहिकाला अशा अनेक संधी मिळतील. याबाबत मला विश्वास आहे. मात्र ‘राष्ट्र प्रथम’ ही भावना मनात ठेवून देशहितासाठी छोटासा वाटा उचलण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. या निर्णयामध्ये मुलगी माहिकाने दाखवलेली समजूदारपणाची भूमिका आणि देशाप्रति तिची भावना पाहून अभिमान वाटत असल्याचेही अमित साटम यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.


























































