साकोलीचे भाजपचे आमदार बाळा काशीवार यांची आमदारकी रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत दोन सरकारी कंत्राटे अस्तित्वात होती हे सिद्ध झाल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार राजेश ऊर्फ बाळा काशीवार यांची निवडणूक अवैध ठरवून रद्द केली. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी बुधवारी हा निर्णय दिला.

काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये-पाटील यांनी काशीवार यांच्या निवडणुकीला आव्हान दिले होते. काशीवार हे सरकारी कंत्राटदार होते. त्यांच्याकडे वर्ग-४ कंत्राटदाराचे लायसन्स होते. २७ सप्टेंबर २०१४ ही निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख होती. त्या दिवसापर्यंत काशीवार यांच्याकडील पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघांच्या बछड्यांसाठी कम्पाऊंड बांधण्याच्या आणि डागा रुग्णालयातील मेट्रो रक्तपेढीचा विस्तार व नूतनीकरणाच्या कामाचे कंत्राट अस्तित्वात होते हे वाघाये यांना न्यायालयामध्ये सिद्ध करण्यात यश आले. त्यामुळे न्यायालयाने लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ९-ए मधील तरतुदीनुसार काशीवार यांना निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरवले व त्यांची निवडणूक रद्द केली.  काशीवार या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाने काशीवार यांच्या विनंतीवरून हा निर्णय ३० दिवसांसाठी स्थगित केला.

 काशीवार यांनी निवडणूक याचिकेच्या विरोधात विविध मुद्दे मांडले होते. वाघाये यांनी नामनिर्देशनपत्र दाखल करताना कंत्राटांवर आक्षेप घेतला नाही. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या तारखेपर्यंत कोणतीही कंत्राटे अस्तित्वात नव्हती, असे त्यांनी न्यायालयाला सांगितले होते. परंतु, त्याचा काशीवार यांना काहीच फायदा झाला नाही. न्यायालयात वाघाये यांच्यातर्फे अ‍ॅड. आर. एम. भांगडे व अ‍ॅड. सौरभ तापडिया तर, काशीवार यांच्यातर्फे अ‍ॅड. शशिकांत बोरकर यांनी कामकाज पाहिले.  ण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपण मुंबईत असून सदर निर्णय लागलेला असल्याचे कळाल्याचे सांगितले. या निर्णयाविरोधात आपण एक महिन्याच्या आत सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.