
भाजपचे ऐरोली विधानसभा क्षेत्रातील आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात नेरुळ पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. नाईक यांच्या विरोधात एका महिलेला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या गुह्याला 24 तास उलटत नाही तोच त्यांच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. दोन गुन्हे दाखल झाल्यामुळे नाईक यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आले आहे.
गणेश नाईक यांच्याबरोबर गेल्या 27 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱया एका महिलेने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नाईक यांच्यापासून आपल्याला एक मुलगा झाला असून तो आता पंधरा वर्षांचा आहे. हा मुलगा पाच वर्षांचा झाल्यानंतर मुलाचा आणि त्याच्या आईचा आपण अधिकृतपणे स्वीकार करू, अशी ग्वाही नाईक यांनी या महिलेला दिली होती. मात्र नंतर नाईक यांनी आपला शब्द फिरवून फसवणूक केली. नाईकांकडून फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येताच पीडित महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास नाईक यांना विरोध केला. मात्र नाईकांनी जबरदस्ती करून आपल्यावर वारंवार अत्याचार केला, अशी तक्रार पीडित महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी नाईक यांच्या विरोधात शनिवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
ठार मारण्याची धमकी
पीडित महिलेने आपल्या हक्काची मागणी केल्यानंतर नाईकांकडून तिला धमकाविणे सुरू झाले. नाईक यांचे पुत्र माजी आमदार संदीप नाईक यांनी या महिलेला शहर सोडून जाण्यासाठी धमकी दिली. गणेश नाईक यांनी त्यांच्या बेलापूर येथील सेक्टर 15 मधील कार्यालयात या महिलेवर रिव्हॉल्व्हर रोखून तिला ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी सीबीडी पोलिसांनी गणेश नाईक यांच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल केला आहे. त्या पाठोपाठ आता हा दुसरा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.






























































