पैसे घेऊन बोगस मतदार नोंदवले! भाजप आमदार मंदा म्हात्रे यांचा उघड आरोप

यापूर्वी मी लढवलेल्या सर्वच निवडणुकांपूर्वी बोगस आणि दुबार मतदारांची यादी निवडणूक आयोगाला दिली होती, मात्र ती नावे कधीच कमी झाली नाहीत. राज्यात अनेक ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी पैसे घेऊन बोगस मतदारांची नोंदणी करीत आहेत. त्यामुळेच तक्रार करूनही ही नावे मतदार यादीतून बाहेर येत नाहीत, असा बॉम्ब बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी सरकारवर फोडला आहे.

नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघात 41 हजार तर बेलापूर विधानसभा मतदारसंघात 35 हजार दुबार आणि बोगस मतदार आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सर्वच स्तरातून निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठल्यानंतर आता भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मतदार नोंदणीतील गैरव्यवहार चव्हाटय़ावर आणला आहे. मी लढवलेल्या सर्वच निवडणुकांपूर्वी बोगस आणि दुबार नावांचा सर्व्हे केला होता. प्रत्येक वेळी सुमारे 20 ते 22 हजार बोगस आणि दुबार नावे मतदार याद्यांमध्ये आढळून आली होती. ती नावे कमी करण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱयांकडे तक्रार केली होती, मात्र ती नावे मतदार यादीतून बाद करण्यात आली नाहीत. अधिकारी आणि कर्मचारीच या बोगस नोंदणीमध्ये सहभागी असतात. त्यासाठी पैशांची देवाणघेवाणही होते, असा आरोप यावेळी मंदा म्हात्रे यांनी केला.

हा लोकशाहीचा अपमान

कोणत्याही निवडणुकीत हार आणि जीत हा प्रश्न नंतर असतो. मात्र बोगस नावामुळे प्रामाणिक उमेदवारांना फटका बसतो. हा लोकशाहीचा फार मोठा अपमान आहे. सध्याचे युग हे संगणक युग आहे. त्यामुळे दुबार आणि बोगस नावांचा शोध घेऊन ते मतदार यादीतून वगळणे हे अवघड नाही. मात्र प्रशासनाच्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे हे होत नाही, अशीही खंत यावेळी मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केली.