भाजप आमदार प्रशांत बंब यांची फौजदाराला दमबाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर 

भाजप आमदार प्रशांत बंब यांचा पोलीस ठाण्यात जाऊन जोरजोराने ओरडत गंगापूरचे पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे यांना दमबाजी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमदार बंब तावातावाने खेकसत होते, तर उपनिरीक्षक इंगळे शांतपणे उत्तर देत होते. उपनिरीक्षकांनी सॅल्यूट न केल्याचे कारण यामागे उकरले जात असले तरी भाजप नगराध्यक्षाच्या पतीचा फोन आल्यानंतरही आपण अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन सोडले नसल्याच्या रागातूनच आमदार बंब यांनी ही दमबाजी केल्याचा अंदाज उपनिरीक्षक इंगळे यांनी बोलून दाखवला आहे.

विशेष म्हणजे आमदार बंब यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत छेडछाड झाल्याचा आरोप करत स्वतःहून या संभाषणाची ऑडीओ क्लिप माध्यमांकडे पाठवली आहे. परंतु त्यातही व्हिडीओतीलच संवाद आहेत. शिवाय आमदार बंब यांनी वृत्तपत्रांना लेखी पत्र पाठवून उपनिरीक्षक इंगळे यांच्या कथित हप्तेखोरीचा पाढा वाचला आहे. गंगापूरच्या तहसील कार्यालयात गुरुवारी एक बैठक होती. उपनिरीक्षक इंगळे तेथे उशिरा पोहोचले. तेथेच आमदार बंब यांचा वाद झाला. नंतर ते पोलीस ठाण्यात आले. तेथेही जवळपास ११ मिनिटे या दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. व्हिडीओ आणि ऑडीओ क्लिपनुसार आमदार बंब हे ‘मी आमदार आहे. लोकप्रतिनिधी असतानाही सॅल्यूट का मारला नाही? पोलीस मॅन्युअल वागले नाही काय? तुम्हाला वागायचे कसे कळत नाही काय?’ अशा शब्दांत इंगळे यांना दमबाजी करत होते. त्यावर इंगळे हे अजिजीने खुलासा करत होते. तुम्ही सांगितलेली गाडी सोडली, असे इंगळे सांगत असल्याचे दिसते. आमदार बंब मात्र त्यांचे ऐकून न घेता त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडत वागणुकीचे पोलीस मॅन्युअल, गुप्त मॅन्युअल वाचण्याचे धडे त्यांना देत होते.

दरम्यान, उपनिरीक्षक इंगळे यांनी बाजू मांडताना सांगितले की, सहा महिन्यांपूर्वी नाकाबंदीत आमदार बंब यांच्या कार्यकर्त्याची गाडी पकडली होती. त्याच्याकडे कागदपत्रे नव्हती. तो अरेरावीच्या भाषेत बोलत होता. त्यामुळे त्याला दंड केला होता. त्याचा राग आमदार बंब यांना असावा. तहसील कार्यालयातील बैठकीच्या वेळी सॅल्यूट केला नाही त्याचाही राग आमदार बंब यांनी धरला असावा. मुख्यमंत्र्यांचे विशेष पथक आणून तुझ्यावर कारवाई करून महाराष्ट्रात कुठेही नोकरी करू देणार अशी धमकीही आमदार बंब यांनी आपल्याला दिल्याचे इंगळे यांनी म्हटले आहे. गंगापूर येथे अलीकडेच अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन पकडले होते. भाजपच्या नगराध्यक्षांच्या पतीचा फोन आला होता. परंतु आम्ही गाडी सोडली नाही आणि गुन्हा दाखल केला. त्यामुळेही आमदारांनी राग धरला असावा, असे सांगून या सगळय़ा वादाची आपण पोलीस डायरीत नोंद केल्याचे इंगळे यांनी म्हटले आहे.

हप्तेवसुलीचे आरोप
आमदार बंब यांनी वृत्तपत्रांना लेखी पत्र पाठवले असून त्यात उपनिरीक्षक इंगळे यांच्या कार्यक्षेत्रात १८ ठिकाणी अवैध दारू विक्री, काही ठिकाणी पत्त्याचे क्लब व मटका सुरू असल्याचे म्हटले आहे. दुचाकी अडवून पैसे उकळणे, गुटखा धारकांवर कारवाई करण्याऐवजी पैसे घेणे, पैसे घेऊन गुटख्याची गाडी सोडणे, वाळूच्या गाडय़ांकडून हप्तेवसुली करत असल्याचे आरोप बंब यांनी इंगळे यांच्यावर केले आहेत.