यूपीत योगी सरकारविरोधात भाजपच्याच आमदारांचे बंड, विधानसभेतच धरणे आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारविरोधात मंगळवारी भाजपच्याच 100 हून अधिक आमदारांनी विधानसभेच्या सभागृहातच धरणे आंदोलन केले. गाझियाबादचे भाजप आमदार नंद किशोर गुर्जर यांना सभागृहात बोलू देण्यात आले नाही. त्यावर योगी सरकारची ही हुकूमशाही खपवून घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत भाजपच्या आमदारांनी विरोधकांना सोबत घेऊन बंड पुकारले.

आमदार नंद किशोर गुर्जर यांच्याविरोधात पोलिसांनी निष्कारण हल्ल्याचा गुन्हा दाखल केल्याचा आरोप आहे. याबाबत गुर्जर हे विधानसभेत आपली बाजू मांडणार होते. मात्र त्यांना बोलण्यास मनाई करण्यात आली. यावरून भाजपचे 100 हून अधिक आमदार आणि विरोधक आक्रमक झाले. या वेळी विधानसभा अध्यक्षांनी गाझियाबादचे एसएसपी सुधीर सिंह यांच्यावर कारवाईचे आश्वासन दिले. त्यानंतर आमदारांनी धरणे आंदोलन मागे घेतले. आश्वासन दिल्याप्रमाणे कारवाई झाली नाही तर बुधवारी पुन्हा हंगामा करू, असा इशारा आमदारांनी दिला आहे. भाजपच्याच आमदारांनी ही आक्रमक भूमिका घेतल्यामुळे योगी सरकारचे भवितव्य संकटात सापडले आहे.