
ठाणे महापालिकेच्या पहिल्याच महासभेत सत्ताधारी शिंदे गट व कमळाबाईमध्ये जोरदार जुंपली. भाजप नगरसेवकांनी मांडलेली लक्षवेधी व प्रश्नोत्तरांकडे कानाडोळा करत शिंदे गटाने कामकाज रेटून नेले. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप नगरसेवकांनी आपली आसने सोडत तीव्र संताप व्यक्त केला. यावर आज भाजप आमदार संजय केळकर यांनीदेखील शिंदे गटाला कडकडीत दम दिला आहे. सभागृहात बोलू देणार नसाल, गळचेपी कराल तर भविष्यात जशास तसा जवाब देऊ, असा थेट इशारा दिला. त्यामुळे सत्तेसाठी ठाणे महापालिकेत एकत्र आलेल्या भाजप व शिंदे गटातील सवतासुभा चव्हाट्यावर आला आहे.
ठाणे पालिकेची सोमवारी पार पडलेली तहकूब महासभा चांगलीच वादळी ठरली. भाजपच्या नगरसेविकांनी मांडलेली लक्षवेधी आणि प्रश्नोत्तरांना बगल देत थेट विषयपत्रिका पटलावर ठेवल्याने सत्तेत असलेल्या शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली. विषयपत्रिकेतील १९ विषय चर्चेविना मंजूर केल्यानंतर उपमहापौर कृष्णा पाटील यांच्यासह भाजपचे नगरसेवक संतप्त झाले. भाजप नगरसेविकांच्या लक्षवेधी सूचना आणि प्रश्नांना बेदखल करून सत्ताधारी शिंदे गटाने भाजपच्या अनेक ज्येष्ठ नगरसेवकांना सभेत बोलूही दिले नाही. त्यामुळे उपमहापौरांनी तर शिंदे गटाच्या मनमानी कारभाराविरोधात खुर्ची सोडून जाब विचारला. दरम्यान, सभागृहातील हा वाद सभागृहाबाहेर पोहोचला असून सभागृहात आंधळेपणाने चर्चेविना विषय मंजूर करणे गैर आहे आणि असा कारभार भाजपचे नगरसेवक सहन करणार नाहीत, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला.
ठाणेकरांना कळू दे काय चालले आहे? महासभेचे थेट प्रक्षेपण करा
सोमवारच्या महासभेत दुर्दैवाने काही महत्त्वाच्या लक्षवेधी सूचना व प्रस्ताव स्वीकारले गेले नाहीत तर जनहिताच्या प्रश्नांवर प्रशासनाकडून खुलासा न मिळाल्यामुळे नगरसेवकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. चार वर्षांनंतर ठाणे महापालिकेत लोकप्रतिनिधींच्या राजवटीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नगरसेवकांकडून सामान्य नागरिकांच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे ठाणेकरांना कळू दे काय चालले आहे? त्यासाठी महासभेचे थेट प्रक्षेपण करा अशी मागणी भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी यांनी महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली.
आम्ही शिंदे गटासोबत युतीत असलो तरी चांगल्या गोष्टीला आमचा पाठिंबा राहील. मात्र चुकीचे। होत असेल तर आम्ही कडाडून विरोध करू. कारण आमची बांधिलकी ठाणेकर जनतेशी आहे हे लक्षात ठेवा. – संजय केळकर (भाजप आमदार)



























































